Maithili Thakur: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अलीनगर जागेवरून भाजपच्या उमेदवार मैथिली ठाकूर यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शपथपत्रात त्यांनी आपल्या शिक्षण आणि संपत्तीचा खुलासा केला आहे. ‘मैथिली ठाकूर यांचे वार्षिक उत्पन्न किती? ‘लोकगायिका आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या मैथिली ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरून बिहारच्या राजकारणात पाऊल टाकले आहे. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम असून, २ कोटी ३२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. मागील पाच वर्षांतील त्यांची कमाई : आर्थिक वर्ष वार्षिक उत्पन्न (रुपये) २०२३-२०२४ २८,६७,३५० २०२२-२०२३ १६,९८,८४० २०२१-२०२२ १५,९३,७३० २०२०-२०२१ ११,१५,१५० २०१९-२०२० १२,०२,९६० या उत्पन्नाचे स्रोत म्हणून त्यांनी गायकी, सोशल मीडिया आणि ब्रँड इंडोर्समेंट यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याकडे ४७,००,००० रुपये किमतीची स्व-अधिग्रहित मालमत्ता आहे, ज्याचे सध्याचे बाजारमूल्य १,५०,००,००० रुपये आहे. शिक्षण आणि पार्श्वभूमी: मैथिली ठाकूर यांचे शिक्षण बीए (प्रोग्राम) पर्यंत झाले आहे, जे त्यांनी २०२२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या भारती कॉलेजमधून पूर्ण केले. त्या मूळच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी येथील उरेन गावाच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील रमेश ठाकूर हे त्यांचे गुरू असून ते त्यांना संगीताचे शिक्षण देतात. सोशल मीडियावर त्यांची मोठी फॅन फॉलोइंग असून त्यांनी बिहारच्या लोकसंस्कृतीला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. या निवडणुकीत अलीनगर जागेवर त्यांचा सामना आरजेडीचे विनोद मिश्रा यांच्याशी होणार आहे.