चोरट्यांचा सुळसुळाट : वाकडच्या विनोदे वस्ती येथील घटना पिंपरी – एका रात्रीत चोरट्यांनी पाच दुकाने फोडली. यामध्ये हॉटेल, वाईन शॉप, मेडिकल, मोबईल पोपेट शॉप यांचा समावेश आहे. पाच दुकानांमधून 83 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 13) रात्री आठ ते बुधवारी (दि. 14) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत वाकडच्या विनोदे वस्तीत घडला आहे. विशाल विलास निकम (वय 34, रा. विनोदे वस्ती, ता. मुळशी) यांनी बुधवारी (दि. 14) याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी निकम यांचे विनोदे वस्ती येथे मोबईल दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी फिर्यादी यांचा एक आणि दुरुस्तीसाठी आलेले तीन मोबाइल फोन तसेच 29 हजार 200 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्याच रात्री विनोदेवस्ती येथील करपे कॉम्प्लेक्स येथे असलेले आयुष मेडीकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन हजार रुपये चोरून नेले. लक्ष्मी चौकात असलेल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील प्रिन्स पोपेट शॉप या दुकानाचे देखील शटर उचकटून चोरट्यांनी तीन हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे. मारुंजी कासारसाई रोडवरील डब्ल्यू स्क्वेअर हॉटेलचा दरवाजा, काच तोडून इन्व्हर्टर, दोन बॅटरी असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. बेंगलोर मुंबई महामार्गावर सपन वाईन शॉपचे शटर आणि पत्रा उचकटून दरवाजा तोडला. काच फोडली. वरील सर्व गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी एकूण 83 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांची युक्ती हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे पाच गुन्हे घडले. मात्र गुन्ह्यांची संख्या वाढू नये म्हणून पोलिसांनी पाच ठिकाणच्या गुन्ह्याची एकत्र नोंद केल्याची चर्चा विनोदे वस्ती परिसरात सुरू आहे.