ठाणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर आता भाजपने आणि शिंदे गटाने (शिवसेना) राहुल गांधी यांच्या विधानाचा विरोध करत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ सुरू केली आहे. आज ही यात्रा ठाण्यात दाखल झाली असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले आहे.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘वीर सावरकरांची देशभक्ती प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. मुद्दाम त्यांच्याविरोधात बोललं जात आहे. या लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला.’
तर दुसरीकडे, सावरकर यात्रेवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “आज अनेक ठिकाणी सावरकर यात्रा निघत आहे. त्यांना ती यात्रा करु दे, परंतु सावरकरांनी या देशाला वैज्ञानिक दृष्टीकोन दिलेला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांचे दिशा देणारे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचे शिंदे-भाजप सरकार पालन करणार असेल तर त्यांचे स्वागत आहे.” यावेळी संजय राऊत यांनी सावरकरांना दाढी वाढवलेलं आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहेत का? असा सवालही केला.