Sunetra Pawar : दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी…” दत्तघाटावर बोलताना सुनेत्रा पवार झाल्या भावूक!
Sunetra Pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दत्तघाटावरील भक्तिमय वातावरणात भावनांना वाट मोकळी करून दिली.

Sunetra Pawar – मानवता हाच धर्म आणि मानवतेची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या विचाराने आयुष्य जगणाऱ्या अजितदादांनी प्रत्येक क्षण जनतेसाठी अर्पण केला. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर उभी आहे. आपले आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू द्या, अशा शब्दांत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दत्तघाटावरील भक्तिमय वातावरणात भावनांना वाट मोकळी करून दिली.
खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील श्रीक्षेत्र दत्तघाट, पाडेगाव येथे आयोजित सकल संत सेवा स्मरण सोहळा, कीर्तन महोत्सव तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताहाला शनिवारी रात्री त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्या म्हणाल्या, दादांची इच्छा होती की समाजात असे मोठे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत. संतांच्या विचारांतूनच समाजात माणुसकी, ऐक्य आणि संस्कार टिकून आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताहासारखे उपक्रम लोकांना मानसिक समाधान आणि अध्यात्मिक ऊर्जा देतात. अशा कार्यक्रमांसाठी लागेल ती मदत कायम केली जाईल. दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आलेल्या या सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांचा स्वर अनेकदा भावूक झाला. “मी संत गोरोबाकाकांच्या भूमीतील लेक आहे. आमच्या घरातही सांप्रदायिक परंपरेशी घट्ट नाते आहे.
आजही कीर्तन आणि प्रवचन ऐकण्याची मनापासून इच्छा असते. आज इथे जास्त वेळ बसता आलं नाही, पण पुढील काळात नक्कीच वेळ काढून अशा भक्तिमय वातावरणात सहभागी होईन,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या सोहळ्यास ह.भ.प. दिलीप झगडे महाराज, शंकरराव मर्दाने, ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे, डॉ नितीन सावंत, विजयराव धायगुडे,
मंगल माने, गोपिचंद धायगुडे संतोष माने, गजानन माने, ज्ञानेश्वर धायगुडे, राजेश चव्हाण यांच्यासह सांप्रदायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दत्त देवस्थानचे पदाधिकारी, महाराज मंडळी, टाळकरी, भजनी मंडळी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण दत्तघाट परिसर हरिनामाच्या गजराने, भक्तिरसाने आणि दादांच्या स्मृतींनी अक्षरशः भारावून गेला होता.





