Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात स्कॉर्पियो कोसळली! मृत 8 जणांची नावे समोर
Ambenali Ghat Accident : आतापर्यंत एका मृतदेहाला दरीतून बाहेर काढण्यात यश

Ambenali Ghat Accident: महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. कुंभरोशी परिसरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटातील तब्बल ८०० फूट खोल दरीत एक स्कॉर्पिओ वाहन कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
वाहनात एकूण 8 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथकाला आतापर्यंत एका मृतदेहाला दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. Ambenali Ghat Accident
प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधील प्रवासी सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील रहिवासी होते. त्यामध्ये आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे (२२), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), महेश अनिल पवार (२५) व आदित्य अशोक साळुंखे (२१)
मर्ढे येथील करण आनंद शिंगटे (२१) व निखिल अभिमन्यू शिंगटे (२५), खटाव येथील वाहन चालक संदीप अशोक काटकर (३७) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील अंश समीर चव्हाण (१९) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी उशिरा रात्री अथवा रविवारी पहाटेच्या सुमारास घडला असावा. वाहनातील प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वाहनाचा शोध घेण्याची विनंती केली होती.
त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान आंबेनळी घाटातील अत्यंत खोल दरीत वाहन कोसळल्याचे स्पष्ट झाले. Ambenali Ghat Accident:
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल विभाग आणि विविध स्वयंसेवी बचाव संस्थांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरीची प्रचंड खोली, घनदाट जंगल, निसरडा उतार आणि अंधारामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. तरीही बचाव पथकांनी जीवाची पर्वा न करता दोरांच्या सहाय्याने दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
शोधमोहीम रात्रभर अखंड सुरू
या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स तसेच महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शनिवारी रात्री सुमारे आठ वाजल्यापासून सुरू झालेली शोधमोहीम रात्रभर अखंड सुरू होती.
अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाला एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश आले. संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलादपूर येथे पाठविण्यात आला असून त्याची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखून शोधमोहीम अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
रविवारी सकाळपासूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. दरीच्या खोल भागात वाहन अडकले असल्याने विशेष तांत्रिक उपकरणे, सुरक्षा दोर आणि प्रशिक्षित बचाव कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. उर्वरित सात जणांचा शोध घेण्यासाठी पथके सातत्याने प्रयत्न करत असून प्रत्येक हालचालीकडे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे.
या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे महाबळेश्वर, पोलादपूर, वाई, सातारा, खटाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचा नेमका घटनाक्रम आणि कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून घाटातील तीव्र वळणे, रात्रीचा प्रवास, वाहनाचा वेग किंवा वाहनावरील नियंत्रण सुटणे यासह विविध शक्यतांचा तपास केला जात आहे.
सातारा जिल्हा सुन्न
दरम्यान, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर आणि अधिकृत पंचनामा झाल्यानंतरच मृतांचा अंतिम आकडा, ओळख आणि अपघाताचे नेमके कारण जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र आंबेनळी घाटातील या भीषण दुर्घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा सुन्न झाला असून, खोल दरीत सुरू असलेल्या बचावकार्याच्या प्रत्येक घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






