Satara News : पोलिसांना उघड आव्हान! खटाव तालुक्यात दीड महिन्यात 8 वेळा वीज तारांची चोरी; 79 हजार फूट तारा लंपास
खटाव तालुक्यातील (Satara News) बुध उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या बुध आणि ललगुण परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

पुसेगाव : खटाव तालुक्यातील (Satara News) बुध उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या बुध आणि ललगुण परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या अवघ्या दीड महिन्यात चोरट्यांनी तब्बल ८ वेळा डल्ला मारत ७९ वीज खांबांवरील सुमारे ७९ हजार फूट अॅल्युमिनियमच्या मुख्य वीज तारा चोरून नेल्या आहेत.
महावितरणच्या लाखो रुपयांच्या या चोरीमुळे आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. चोरट्यांनी एकप्रकारे पुसेगाव पोलिसांनाच उघड आव्हान दिले आहे.
गाव बदलून चोऱ्यांचे सत्र
पूर्वी नेर तलाव, नदीकाठच्या विहिरींवरील मोटारी, तांब्याची केबल आणि स्टार्टर चोरीला जाण्याच्या घटना (Satara News) घडत होत्या. मात्र, आता चोरट्यांनी थेट महावितरणच्या मुख्य अॅल्युमिनियम तारांनाच लक्ष्य केले आहे.
बुध परिसरातील चोऱ्या
सर्वात आधी बुध येथील लालबाग शिवारातील पुंडकर डीपीवरील ११ खांबांच्या तारा चोरीला गेल्या. त्यानंतर काटेवाडी येथील कचरे डीपीवरील १४ पोल आणि बुध मेन रोडवरील कळसे डीपीवरील ६ पोलच्या तारा (Satara News) चोरट्यांनी लंपास केल्या.
यानंतर लागोपाठ दुसऱ्याच दिवशी याच डीपीवरील ५ पोल आणि काही दिवसांनी तेलक शिवारातील ११ पोलच्या तारा चोरीस गेल्या.
ललगुण परिसराकडे मोर्चा
बुध गावातील वाढत्या संतापानंतर चोरट्यांनी ललगुण शिवाराला लक्ष्य केले. ललगुण येथील खंडोबा माळ परिसरातील गोवर्धन डीपीवरील पहिल्या दिवशी १२ आणि दुसऱ्या दिवशी १० अशा २२ खांबांवरील तारा चोरीला गेल्या.
त्यानंतर पुन्हा १० खांबांवरील तारा चोरून चोरट्यांनी नुसतेच पोल मोकळे सोडून दिले. काही ठिकाणी चोरट्यांनी वीज खांबही खाली पाडल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
विहिरींना पाणी, पण वीज नसल्याने पिके जळाली!
सध्या तीव्र उन्हाळा आणि पाण्याचे संकट असताना, विहिरींमध्ये थोडेफार पाणी असूनही वीज नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाहीये. यामुळे ऊस, आले, पेरू यांसारखी नगदी व बारमाही पिके आणि फळबागा डोळ्यादेखत वाळून चालल्या आहेत. चारा पिके आणि नव्या आले लागवडीसाठीही मोठी अडचण निर्माण झाली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे तारा मिळेनाशा!
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या अॅल्युमिनियमच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बाजारात या तारा मिळणेही कठीण झाले आहे, म्हणूनच ही अॅल्युमिनियम चोरणारी संघटित टोळीच परिसरात सक्रिय झाल्याचा संशय शेतकरी व्यक्त करत आहेत. २४ तास शेतात वीज खांबांवर पाळत ठेवणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने चोरट्यांचे फावले आहे.
खांबावरील तारा चोरी वेळी त्याठिकाणचा डिपी बंद करून चोरटे ट्रॅक्टरचा वापर करून तारा चोरून नेत आहेत. या चोरीमध्ये त्या खांबावरील डिपी कुठे आहे, त्याचा सप्लाय बंद करून ठेवतात. म्हणजे यामध्ये कुणीतरी माहितीचा माणूस असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. चोरी झाल्यानंतर सप्लाय पुन्हा सुरु करुन जातात.हे यातील विशेष आहे
पुसेगाव पोलिसांवर शेतकरी नाराज; गस्तीची मागणी
प्रत्येक चोरीनंतर महावितरण आणि शेतकऱ्यांकडून पुसेगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना एकाही चोरीचा छडा लावता आलेला नाही. पोलीस केवळ पंचनामे करण्यात मग्न असून चोर मोकाट असल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुसेगाव पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी यापूर्वी गुन्हा अन्वेषण विभागात दमदार कामगिरी केली आहे. त्यांना चोरट्यांना पकडून लगाम लावल्याचे अनुभव जास्त असल्यामुळे त्यांच्यावर शेतकऱ्यांची मोठी भिस्त आहे.त्यामुळे ते या चोरीकडे किती गांभीर्याने बघतात यावरचं सर्व काही अवलंबून आहे.
प्रशासन आणि महावितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा, तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरट्या टोळीला तात्काळ गजाआड करावे, अशी आग्रही मागणी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.






