मुंबई – सध्या विवाह सहजतेने होणे अवघड झाले आहे. त्यात विहाह झाल्यानंतर टिकवणे कठीण झाले आहे. मात्र मुंबईत लग्न होऊन एक महिनाही होत नाही, तोच पतीने पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलल्याचे समोर आले आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. हर्बर लाईनवरील गोवंडी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. अन्वर अली शेख असं आरोपीचे नाव आहे. अन्वरचे एका महिन्यापूर्वी पूनम चव्हान या महिलेशी लग्न झाले होते. पूनमचेही हे दुसरे लग्न होते. तिली एक तीन वर्षांची मुलगीही आहे. अन्वरशी लग्न केल्यानंतर पूनम त्याच्यासोबत मानखुर्दमधील चाळीत राहात होती. दोघेही छोटी मोठी कामं करून उदरनिर्वाह करत होते. दरम्यान सोमवारी हे दाम्पत्य लोकलने प्रवास करत होते. यावेळी पत्नी पूनम दरवाज्याजवळ असलेल्या खांबाला पकडून उभी होती. काही वेळाने पती अन्वरने पूनमला पाठीमागून मिठी मारली. त्यामुळे तिने खांब सोडून दिला. त्याचवेळी अन्वरने पत्नीला धक्का देत लोकलमधून बाहेर ढकललं. पत्नी पडल्यानंतरही अन्वर शांत होता. त्यामुळे लोकमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला शंका आली. तिने सर्व प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर अन्वरला अटक करण्यात आली.