– प्रा. डॉ. संजय वर्मा बुधवारी मणिपूरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी होती. आसाम, मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा असावी. गेल्या महिन्यात जपानच्या क्युशू बेटावर 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. हा 2025 मधील दुसरा मोठा भूकंप होता. त्याआधी भारताच्या शेजारी असणार्या तिबेटमध्ये भूकंपाने 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अलीकडेच इंडोनेशिया, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीमध्ये नुकतेच 7 दिवसांत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. नैसर्गिक आपत्ती किंवा भूकंपापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सजगता आणि बचावाची सक्षम व्यवस्था. यासंदर्भात अनेक देशांचे दाखले आपल्यापुढे आहेत. जपानचे उदाहरण तर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अल्जेरियासारख्या देशातही आता शाळा, निवासी घरकुलांचे बांधकाम सीस्मिक कोडनुसार करण्यात येत आहे. परिणामी भूकंपाच्या काळात हानीची तीव्रता कमी राहण्यास मदत मिळत आहे. आपल्याकडे मात्र एखाद्या भागात भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरू होते. काही दिवस काळजी घेतली जाते आणि खबरदारी म्हणून सजगताही पाळली जाते. कालांतराने ‘जैसे थे’ होते. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता चारच्या आसपास होती. हा भूकंप काही अचानक झालेला नाही. त्याची पूर्वसूचना तिबेटच्या भूकंपाने दिली होती. परंतु आपण गाङ्गील राहिलो. हिमालय आणि संलग्न भागात भूकंपाचा धक्का हा आता एकप्रकारे इशारा मानायला हवा. पण भूकंपाच्या सतत बातम्या येणे या गोष्टी चिंतेत भर घालणार्या आहेत. पर्वतीय राज्यांत प्रामुख्याने उत्तराखंडपासून ते देशाची राजधानी दिल्ली एनसीआरदरम्यान सध्या भूगर्भातील स्थिती चिंताजनक आहे आणि कोणत्याही क्षणी या भागात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसू शकतो, असे इशारे दिले जात आहेत. डेहराडून येथील ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑङ्ग हिमालयन जिओलॉजी’च्या शास्त्रज्ञांच्या इशार्यानुसार हिमालय परिसरात महातीव्रतेचा भूकंप कधीही येऊ शकतो. म्हणून मनुष्यहानी आणि वित्तहानी मर्यादित ठेवण्यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांच्या मते, पृथ्वीच्या भूगर्भात असणार्या भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यात घर्षण सुरू आहे. परिणामी तेथे ऊर्जा निर्माण झाली आहे आणि ती कधीही मोठ्या स्ङ्गोटासह बाहेर पडू शकते. ही बाब विनाशकारी भूकंपाला कारणीभूत ठरू शकते. वाडिया इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञानुसार, हिंदूकुश पर्वतापासून ईशान्य भारतापर्यंत हिमालयाचा भाग हा भूकंपप्रवण आणि संवेदनशील आहे. मात्र या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी संबंधित राज्यांत परिणामकारक धोरणांचा अंमल दिसत नाही. पृथ्वीच्या पोटात सुरू असलेल्या घडामोडींमुळे ज्वालामुखी ङ्गुटण्यापासून भूकंपापर्यंतचा धोका कायम राहिला आहे. परिणामी पृथ्वीवर भूकंपाचे धक्के दरवर्षी जाणवतात. यात हानिकारक भूकंपाची संख्या खूपच कमी आहे. मोठ्या भूकंपाची अशी ठराविक तारीख, वेळ निश्चित नसल्याचे शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून सांगत आले आहेत. पण आतापर्यंत भूकंपाची आगाऊ सूचना देणारी प्रणाली का विकसित होऊ शकली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात चांगले योगदान देऊनही मनुष्यप्राणी आजही पृथ्वीच्या उदरात चाललेल्या घडामोडीचे आकलन करण्यास अक्षम ठरला आहे. चार वर्षांपूर्वी भूकंपाबाबत सजगता आणण्यासाठी उत्तराखंडमध्ये पुढाकार घेतला गेला. 2021 मध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयआयटी रुरकीने एकत्र येत उत्तराखंड भूकंप अॅलर्ट अॅप तयार केला. यानुसार भूकंपाची पूर्वसूचना देणारा अॅप लागू करणारे उत्तराखंड पहिले राज्य ठरल्याचा दावाही करण्यात आला. शिवाय ज्यांच्याकडे स्मार्टङ्गोन नाही, त्यांच्याही ङ्गोनवर भूकंपाची पूर्वसूचना मिळेल, असेही सांगण्यात आले. या अॅपमुळे लोकांना वेळीच यापासून बचाव करता येणे शक्य होईल, असे वाटू लागले. गेल्या दहा-पंधरा वर्षांत उत्तराखंडला भूकंपाचे 700 हून अधिक धक्के बसले. या पार्श्वभूमीवर या ‘अॅप’ला एक वरदान म्हणून पाहिले जाऊ लागले. परंतु प्रत्यक्षात या अॅपचा उत्तराखंडच्या नागरिकांना काहीच ङ्गायदा झाला नाही. वास्तविक हिमालय भागातील भौगोलिक स्थितीचे आकलन केले तर तेथे भूगर्भातील हालचालींमुळे भूकंप येण्याचा धोका हा नेहमीच राहतो. तरीही भारत भूकंपाची पूर्वसूचना देणारी एकही विश्वसनीय प्रणाली विकसित करू शकला नाही. इतकेच नव्हे तर जगभरात अशा प्रकारची कोणतीच प्रणाली अस्तित्वात नसल्याचे सरकारने सांगून टाकले आहे. त्यामुळे कोणताही देश, संघटना किंवा शास्त्रज्ञ भूकंप, ज्वालामुखी आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक संकटाची पूर्वसूचना देऊ असे ठाम सांगू शकले नाही. एक घटना इटलीतील भूकंपाच्या पूर्वसूचनेशी संबंधित असून या घटनेने जगभरातील शास्त्रज्ञांच्या गटाला अस्वस्थ केले. प्रत्यक्षात दीड दशकापूर्वी 2011 मध्ये सहा शास्त्रज्ञ आणि एक सरकारी अधिकार्यांविरोधात हत्येचा खटला दाखल करण्यात आला. कारण ते 6 एप्रिल 2009 मध्ये इटलीतील ला अकिला येथील भूकंपाचे योग्य भाकित करू शकले नाहीत किंवा करण्यास अपयशी ठरले. ही मंडळी इटलीतील नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्य धोक्यावर देखरेख करणार्या समितीचे सदस्य होते. त्यांना ला अकिला येथील भूकंपाच्या एक दिवस अगोदर पाचारण करण्यात आले होते आणि येत्या काही दिवसांत भूकंप तर होणार नाही ना? अशी विचारणा केली गेली हेाती. त्यांना बोलाविण्याचे कारण म्हणजे संबंधित संवेदनशील भागात रेडॉन वायू बाहेर पडत होता. पण शास्त्रज्ञांनी संबंधित भाग रिकामा केला जावा अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांंगितले. परंतु दुसर्या दिवशी 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आणि त्यात 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. जगभरातील हजारो शास्त्रज्ञांनी सामुदायिक निवेदन देत या खटल्याला विरोध केला. त्यांच्या मते, शास्त्रज्ञांना बळीचा बकरा करू नये आणि त्याऐवजी सुरक्षेच्या उपायांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण भूकंपाविषयीची अचूक भविष्यवाणी करणारी कोणतीही प्रणाली अद्याप विकसित झालेली नाही. रेडॉन गॅसचा मुद्दा पाहिला तर ती भूकंपाचे भाकित करणारी एक वादग्रस्त प्रणाली असून अनेकदा ङ्गोलही ठरली आहे. तूर्त कोणत्या क्षणी आणि कोठे किती तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसेल, हे आताच सांगता येत नाही. प्रत्यक्षात भूगर्भातील प्लेट हे एकमेकांना जोडल्याने आणि वेगळे होणे तसेच ताटातूट होत असल्याने जमिनीत दबाव, रासायनिक क्रिया या कारणांमुळे निर्माण होणार्या ऊर्जा लहरी याची गोळाबेरीज केली असता त्याचे विकृत रूप भूकंपाच्या माध्यमातून वेळोवेळी पाहावयास मिळाले आहे. अर्थात भूकंपापासून आपण काही धडे शिकलो तर या नैसर्गिक संकटापासून काही प्रमाणात स्वत:चा बचाव करू शकू.