पुणे : मध्य रेल्वेने करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी “जीवाका’ नावाचा रोबोट तयार केला आहे. याचे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या हस्ते व्हर्च्युअल’ उद्घाटन झाले. मध्य रेल्वे परेल येथील कार्यशाळेत एका खासगी कंपनीच्या सहकार्याने “मेडीबोट जीवाका’ हा रोबोट तयार केला असून, महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने या रोबोटची निर्मिती केली आहे. ‘जीवाका’ हा रिमोटवर आधारित रोबोट असून, तो रुग्णांच्या बेडपर्यंत जाणार आहे. रक्तदाब, ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान हा रोबोट मोजणार आहे.
यामध्ये व्हिडिओद्वारे देखील संवाद साधण्याची क्षमता असून, याद्वारे डॉक्टर व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णांशी संवाद साधणार आहे. यामध्ये औषधांची पेटीदेखील असून, रोबोट रुग्णांना औषधे देखील देऊ शकणार आहे.
याशिवाय रोबोटच्या निर्जंतुकीकरणाची देखील व्यवस्था असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परेलच्या कार्यशाळेमध्ये यापूर्वी पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझरच्या निर्मितीसह रेल्वे बोगीचे रुपांतर अलगीकरण कक्षामध्ये केले होते. ए.के. गुप्ता, बी.एम.अग्रवाल, विवेक आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली या रोबोटची निर्मिती केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.