रिंगरोड… स्पीड 120

पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या सुमारे पूर्व व पश्चिम असा एकुण 174 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या कामाने गती घेतली आहे. या रिंगरोडचा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर बांधण्यात येणार असून या रस्त्यावरून तासी 120 किलोमीटर या वेगाने प्रवास करता येणार आहे. पश्चिम रिंगरोड केळवडे (ता.भोर) ते उर्से (ता. मावळ) हे सुमारे 69 किलोमीटरचे अंतर 35 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्यस्थितीत हेच अंतर पार करण्यासाठी 1 तास 15 मिनिटे इतका वेळ लागतो.
पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. रिंगरोड 110 मीटर रूंद म्हणजे सहा पदरी असणार आहे. तसेच, या रिंगरोडला राज्य सरकारकडून “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. तसेच, हा रिंगरोड करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य शासनाने एमएसआरडीसीची नियुक्ती केली आहे. यामुळे या रस्त्याच्या कामासाठी करावे लागणारे भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारच्या मदतीने उभारता येणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी यापूर्वी चार पर्याय निवडण्यात आले होते.
मात्र, हे सर्व पर्याय बाजुला ठेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. भूसंपादनासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद सुध्दा केली आहे. आता, पश्चिम भागातील रिंगरोडचे मोजणी काम सुरु आहे. तर मोजणीचे काम पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.
रिंगरोडवर वाहने 120च्या वेगाने धावणार आहेत. यानुसार रस्तांची बांधणी केली जाणार आहे. रस्त्यावर कोणतीही वाहने अथवा जनावरे अचानकपणे येऊ नये, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुला सीमाभिंत बांधली जाणार आहे. ठराविक ठिकाणावरूनच रिंगरोडवर प्रवेश करता येणार आहे.
– संदीप पाटील, उपअभियंता, एमएसआरडीसी
रिंगरोडमुळे होणारे फायदे…
- प्रवास वेगवान होईल.
- शहरा बाहेरून वाहने धावतील
- वाहनांची गर्दी कमी होईल
- प्रदूषण कमी होईल
- रिंगरोड परिसरात उद्योग व व्यवसाय वाढतील

