धर्मशाला: हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील शासकीय पदवी महाविद्यालयातील एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ आणि रॅगिंगमुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. १८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींनी तिला मारहाण केली आणि धमकी दिली. या रॅगिंगमुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेली होती. त्यानंतर, पीडितेची प्रकृती खालावत गेली. २६ डिसेंबर रोजी लुधियाना येथील डीएमसी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी व्हिडिओद्वारे केला खुलासा मृत्यूशी झुंज देण्यापूर्वी पीडितेने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्यासोबत घडलेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या प्रसंगांचे वर्णन केले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक अशोक कुमार यांनी तिची छेड काढली, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिचा मानसिक व लैंगिक छळ केला, असे गंभीर आरोप तिने या व्हिडिओत केले आहेत. वडिलांचे गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे की, प्राध्यापकाच्या अश्लील कृत्यांमुळे आणि सहकाऱ्यांनी केलेल्या रॅगिंगमुळे त्यांची मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. कुटुंबाला बसलेला धक्का आणि मुलीची खालावलेली प्रकृती यामुळे तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांगडा जिल्ह्याचे एएसपी (ASP) अशोक रतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७५, ११५(२), ३(५) आणि हिमाचल प्रदेश शैक्षणिक संस्था (रॅगिंग प्रतिबंधक) अधिनियम, २००९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. “आम्ही मुलीचे मेडिकल रेकॉर्ड्स, तिने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जबाब आणि इतर पुराव्यांची सखोल तपासणी करत आहोत. लवकरच या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशात संतापाची लाट उसळली असून, शैक्षणिक संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.