Mehbooba Mufti – भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराचा देशातील शेतकऱ्यांवर आणि विशेषतः फळ उत्पादकांवर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करत पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कराराचा फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे. जम्मू-काश्मीरच्या फलोत्पादन उद्योगाचे रक्षण करण्यासाठी अमेरिकन सफरचंदांवर किमान ५० टक्के आयात शुल्क लागू करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली. नव्या व्यापार करारामुळे भारतीय शेतकऱ्यांची सुरक्षा कवचे संपुष्टात आली आहेत. याचा फटका देशभरातील शेतकऱ्यांना बसेलच, पण जम्मू-काश्मीरमधील सफरचंद आणि सुका मेवा उत्पादक यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. येथील तरुणांचा रोजगार, मुलांचे शिक्षण आणि एकूणच अर्थव्यवस्था या फलोत्पादन क्षेत्रावर अवलंबून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने फलोत्पादन हाच येथील लोकांचा कणा आहे. अशा परिस्थितीत बाहेरील सफरचंद स्वस्त दरात उपलब्ध झाल्यास स्थानिक उत्पादक स्पर्धेत टिकू शकणार नाहीत, असे त्यांनी म्हणटले. मुफ्ती यांनी अमेरिकन आणि भारतीय शेतकऱ्यांमधील विषमतेवर बोट ठेवले.तसेत त्यांनी यापूर्वी इराणच्या सफरचंदांनी बाजारपेठेचे नुकसान केले होते याची आठवण करुन दिली. २०१९ च्या घडामोडींनंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेने अत्यंत संयम राखला आहे, असे नमूद करत त्यांनी केंद्र सरकारला सतर्क केले की, जर येथील लोकांचा रोजगार हिरावला गेला, तर बेरोजगारी आणि नैराश्य वाढेल. याचा थेट परिणाम सामाजिक परिस्थितीवर होऊ शकतो आणि तरुणांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी या संवेदनशील राज्याची स्थिती लक्षात घेऊन फळ उद्योगाला संरक्षण द्यावे, असे त्या म्हणाल्या. केवळ आयात शुल्कच नव्हे, तर राज्य सरकारने पीक विमा योजना लागू करावी, शीतगृहांची संख्या वाढवावी आणि वारंवार बंद पडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही मेहबूबा मुफ्ती यांनी यावेळी केली.