कराड – रशिया येथे शिक्षण घेणारे पश्चिम महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी भारतात परतले आहेत. खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे सर्व विद्यार्थी मंगळवारी सकाळी मायदेशात सुखरूप पोहचले. रशिया येथील अलताई स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत होते. मात्र, करोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन परिस्थिती उद्भवल्याने ते गेल्या तीन महिन्यापासून तेथेच अडकून पडले होते. कराड येथील रणजित शिंदे यांची मुलगी मृणाली शिंदे ही देखील त्याठिकाणी शिक्षण घेत आहे. तिला भारतात माघारी येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे रणजित शिंदे यांनी केली होती. त्याची दखल घेत खा. पाटील यांनी मृणालीशी संपर्क साधून संवाद साधला. येणाऱ्या अडचणीबाबत माहिती घेऊन तिच्यासोबत आणखी किती विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत याची विचारपूस केली. पश्चिम महाराष्ट्रातील आणखी 26 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती तिने दिली. त्यानुसार सर्व 27 विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडून खा. श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांना पत्र लिहले. वंदे भारत योजने अंतर्गत सदर विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यास परराष्ट्र मंत्रालयाकडून व रशियातील भारतीय दूतावास यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मास्को ते मुंबई विमानाने मंगळवारी सकाळी सदर विद्यार्थ्यांचे मुंबई येथे आगमन झाले. करोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.