Weather update : देशभरात तीव्र उष्णतेच्या लाटा थैमान घालत आहेत. त्यातच १२ राज्ये वणव्यांच्या विळख्यात सापडली आहेत. उपग्रहाच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या जंगलांमध्ये शेकडो मोठ्या वणव्यांची नोंद झाली आहे. भारतीय वन सर्वेक्षणच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी किमान १० ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ सतत वणवे पेटलेले आढळले. मध्य भारतातील मध्य प्रदेश हे सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. उत्तरेकडील उत्तराखंड, पश्चिमेकडील गुजरात आणि दक्षिणेकडील आंध्र प्रदेश अशा भारतातील १२ हून अधिक राज्यांमध्ये मोठ्या आगींनी जंगलाचा मोठा भाग जाळून टाकला आहे. एफएसआयच्या आकडेवारीनुसार, भारतातील जवळपास निम्मा वनक्षेत्र आग लागण्याच्या धोक्याचा आहे. एप्रिलमधील वणव्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, उत्तराखंडपासून आंध्र प्रदेशपर्यंत पसरलेल्या या वणव्यांमुळे वन्यजीवांना धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. Summer News गेल्या काही दिवसांत ६३४ मोठ्या आगीच्या घटनांची नोंद झाली. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी ४६५ घटनांची नोंद झाली, तर आंध्र प्रदेशात ४०० हून अधिक घटनांची नोंद झाली. याशिवाय, ईशान्य भारतात, जिथे वणवे लागण्याची सर्वाधिक शक्यता असते, तिथे आसाममध्ये १९० आणि मणिपूरमध्ये १२८ आगीच्या घटनांची नोंद झाली. देशाच्या मध्य आणि दक्षिण भागांना वणव्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तराखंडमध्ये वणव्यांमुळे किमान १३० हेक्टर जमीन प्रभावित झाली आहे. चार धाम यात्रा मार्गाच्या अनेक भागांमध्येही आगी लागल्याचे वृत्त आहे. कोणते भाग झाले प्रभावित? आगीमुळे उत्तराखंडमधील लॅन्सडाउन, राणीखेत आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हिमाचल प्रदेशातील शिमला, तामिळनाडूतील निलगिरी, आंध्र प्रदेशातील शेषाचलमची जंगले आणि ओडिशातील बालिगुडा येथील वनक्षेत्र या पर्यटन स्थळांना फटका बसला आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या २०२१ च्या वार्षिक अहवालानुसार, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा, तसेच मध्य ओडिशा येथील काही भाग वणव्यांसाठी अत्यंत संवेदनशील हॉटस्पॉट बनत आहेत.