Shivsena: जिल्हा परिषद निवडणुकांनंतर शिवसेना (शिंदे गट) पक्ष अॅक्शन मोडमध्ये आला असून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमधील शिवसेनेच्या एका प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर पक्षबांधणीवर भर देत शिवसेनेने अंतर्गत शिस्त कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगडमध्ये महायुतीची सत्ता आली असली तरी सत्ता मिळवताना शिवसेनेला अडचणींचा सामना करावा लागला. पक्षातील अकार्यक्षमता आणि पक्षविरोधी कारवायांमुळे अपेक्षित यश मिळवणे कठीण झाले होते. यामुळे आता अशा घटकांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. उत्तर रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी रोहा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोठा निर्णय घेतला. या बैठकीत रोहा तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. हेही वाचा – Unseasonal Rains: पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर रोहा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली होती. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. पक्षाच्या उमेदवारांना अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने अनेकांनी विरोधकांना मदत केल्याचेही समोर आले. अशीच परिस्थिती जिल्हा परिषद निवडणुकीतही दिसून आली. दरम्यान, मनोज शिंदे हे नगरपालिका निवडणुकीपासूनच तटकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर केणी यांनी कठोर भूमिका घेत संपूर्ण तालुका कार्यकारिणीच बरखास्त केली. पक्षात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत भविष्यातही अशा कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत या निर्णयातून देण्यात आले आहेत.