Ambadas Danve : “जनतेच्या हातातील गाड्या हिरावून, त्यांच्या हातात ‘हातगाड्या’ देणे, हाच या सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ दिसतोय”
Ambadas Danve : इंधन दरवाढीच्या मुद्यावरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

Ambadas Danve : विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सध्याच्या परिस्थितीवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील अनेक भागात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
पेट्रोल पंपावर दीड ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत, तर काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत. असे असतानाही सरकारकडून मात्र टंचाई नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे. याचे वास्तव दाखवत अंबादास दानवे यांनी थेट फोटो ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर केला आहे.
अंबादास दानवे यांची पोस्ट
“देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ ‘सर्कस’ सुरू आहे! पेरणीच्या तोंडावर बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट ‘साठेबाज’ ठरवून मोकळे होतात! या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग पुरवठा विभाग झोपला आहे का?,” असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. Ambadas Danve
देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ ‘सर्कस’ सुरू आहे! पेरणीच्या तोंडावर बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट ‘साठेबाज’ ठरवून मोकळे होतात! या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग… pic.twitter.com/S0tVULaaVu
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 23, 2026
दुसरीकडे, जालना जिल्ह्यात काल ‘शाही फर्मानाचा’ कळस पाहायला मिळाला. ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांकाशिवाय कॅनमध्ये डिझेल देणार नाही, असा फर्मान काढण्यात आला. पण जे गरीब शेतकरी नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणतात, त्यांनी डिझेल कुठून आणायचे, यावर स्पष्टीकरण यात नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन, त्यांच्या हातात ‘हातगाड्या’ देणे, हाच या सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ दिसतोय! व्वा रे महायुती.. अन व्वा रे एनडीए!,” असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
दरम्यान, मराठवाड्यात शेतीच्या मशागतीची कामे डिझेलअभावी रखडली आहेत. अनेक पेट्रोल पंपावर शेतकरी कॅन घेऊन रात्र काढत आहेत. शेतीची कामे खोळंबल्याने याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर आणि महागाईत होणार आहे. अशावेळी सरकारने प्रभावी उपाय योजना करण्याऐवजी शेतकऱ्यांना सातबारा असेल तरच डिझेल देण्याचा आदेश काढला. यावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. Ambadas Danve
मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
तर काल शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रशासनाकडे दरवर्षी लागणाऱ्या इंधनाचा अंदाज असतो. मात्र, काही भागांत अचानक मागणीत मोठी वाढ दिसून येत असल्याने परिस्थितीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल, तर त्यावर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:
Pune District : गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद





