Nashik: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अद्याप ताजे असतानाच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक ‘सेक्स स्कँडल’ उघडकीस आले आहे. सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाच्या हार्ड डिस्कमध्ये १०० हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच ऑफिसमधील कामगारांनी हे व्हिडिओ चोरून संबंधित मालकाला १२ लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं प्रकरण काय? सातपूर पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने त्याची हार्ड डिस्क चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तपास चक्रं फिरवली असता, त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने ती चोरल्याचे निष्पन्न झाले. चोरीच्या या प्रकरणातून पुढे जे सत्य बाहेर आले, त्याने पोलीसही चक्रावून गेले. १०० महिलांचे व्हिडिओ आणि १२ लाखांची खंडणी – चोरलेल्या हार्ड डिस्कमध्ये सुमारे १०० हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले. हे व्हिडिओ २००३ ते २०२४ या प्रदीर्घ कालावधीत चित्रित करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित आरोपींनी हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडे सुरुवातीला १० हजार रुपये मागितले, जे त्याने दिले. मात्र, त्यानंतर आरोपींची हाव वाढली आणि त्यांनी तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. हेही वाचा – Nagpur : 15 वर्षाच्या मुलीचं 35 वर्षांच्या व्यक्तीसोबत लावत होते लग्न; पण तेवढ्यात पोलिस आले अन्…. स्वतःला पत्रकार सांगणारा ‘कन्सल्टंट’ आणि ज्योतिषी – संबंधित व्यावसायिक स्वतःची ओळख पत्रकार म्हणून सांगत असे. मात्र, पोलीस तपासानुसार तो महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी ‘कन्सल्टंट’ म्हणून मार्गदर्शन करत होता. इतकेच नाही, तर तो पार्ट-टाइम ज्योतिषी म्हणूनही काम पाहत असल्याचे समोर आले आहे. याच कामाच्या निमित्ताने आलेल्या महिलांचे व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले असावेत, असा संशय आहे. पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या – खंडणी मागणाऱ्या चार संशयितांना सातपूर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे हे व्हिडिओ व्हायरल होण्यापासून वाचले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन – “जर अशा प्रकारे कोणी महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार करत असेल, तर पीडित महिलांनी न घाबरता पुढे यावे. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य आणि कायदेशीर न्याय मिळवून देऊ,” अशी प्रतिक्रिया ‘अंनिस’चे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे. पीडित महिलांना पोलिसांचे आवाहन – या प्रकरणात सहभागी असलेल्या महिलांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. जर पीडित महिलांनी समोर येऊन तक्रार दिली, तर संबंधित व्यावसायिकावरही कठोर गुन्हे दाखल केले जातील. नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक अशा घटना समोर येत असल्याने सोशल मीडियावर याला ‘खरात पॅटर्न २’ असे म्हटले जात असून, सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.