weather update – राज्यासह देशभरात उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक माहिती हवामान विभागाने दिली आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी ही की, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून आपल्या नियोजित वेळेतच अंदमान-निकोबार बेटांवर धडकणार आहे. मात्र, दुसरीकडे सुपर एल निनोचा धोका असल्याने यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, १८ ते १९ मे दरम्यान मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होईल. मान्सूनचा हा पहिला टप्पा वेळेत पूर्ण होत असल्याने, १ जूनच्या सुमारास तो केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला मान्सून ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पावसावरच अवलंबून असल्याने अंदमानातील त्याच्या वेळेवर आगमनाने देशवासियांना किंचित दिलासा मिळाला आहे. हवामान तज्ञांच्या मते, यंदा प्रशांत महासागरात एल निनोची परिस्थिती निर्माण होत असून तो ‘सुपर एल निनो’ ठरण्याची शक्यता आहे. समुद्रसपाटीचे तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याचा अंदाज आहे. याचा थेट परिणाम मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यावर (ऑगस्ट ते सप्टेंबर) होणार आहे. हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, २०२७ च्या सुरुवातीपर्यंत एल निनोचा प्रभाव राहू शकतो, ज्यामुळे भारताच्या हिवाळ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात पारा चढलेलाच? राज्यात पुढील १५ दिवस हवामानाचे विविध रंग पाहायला मिळतील. १३ मे पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील. १४ ते २१ मे दरम्यान उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. या काळात संपूर्ण कोकण पट्ट्यात रात्रीचे तापमानही अधिक राहणार असल्याने उकाडा वाढेल. पावसाबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमीच असेल. मात्र, १४ ते २१ मे दरम्यान तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.