Jyotiba Chaitra Yatra 2026 – दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा जोतिबा डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने दुमदुमला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. अनेक गावातून मानाच्या काठ्या या जोतिबाच्या डोंगरवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. दख्खनचा राजा जोतिबा यांच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस असून कोल्हापुरात भक्तांचा महासागर उसळला. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक जोतिबा डोंगर येथे दाखल झाले. दिवसभरात तब्बल दहा लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील यावेळी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या 108 मानाच्या सासनकाठ्या आधीच दाखल झाल्या असून महाराष्ट्रासह सीमाभागातून शेकडो सासनकाठ्या यात्रेत सहभागी झाल्या.