Heatstroke : धक्कादायक ! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उष्माघाताचा पहिला बळी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या तापमानात (Heatstroke) मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या सर्व भागांत सूर्य प्रचंड आग ओकत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू आहे.

Heatstroke : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या तापमानात (Heatstroke) मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या सर्व भागांत सूर्य प्रचंड आग ओकत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू आहे. अकोल्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
यामुळे प्रशासनाने नागरिकांना केवळ आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने सांगितले की, अजून तीन-चार दिवस अशी उष्णतेची लाट (Heatstroke) कायम राहणार आहे.
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहावर कोणत्याही मारहाणीच्या किंवा जखमेच्या खुणा नव्हत्या.
पोलिसांचा अंदाज आहे की, या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. तरीही पोलिसांनी उष्माघाताचा (Heatstroke) संशय व्यक्त केला आहे. यामुळे अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची बातमी समोर आली आहे.
उष्माघात (Heat Stroke) म्हणजे काय आणि तो टाळण्यासाठी काय उपाय करावेत?
उष्माघात हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा बिघडल्यामुळे होतो. शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त झाल्यास हा धोका वाढतो. याची लक्षणे म्हणजे तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या, घाम येणे थांबणे, त्वचा लालसर आणि कोरडी होणे, गोंधळ किंवा बेशुद्ध पडणे.
उष्माघात टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय
भरपूर पाणी प्या
दिवसभरात ३-४ लिटर किंवा त्याहून जास्त पाणी प्या, तहान लागली नसली तरीही. लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक किंवा ORS घ्या. सोडा, कोल्ड ड्रिंक्स, चहा, कॉफी आणि अल्कोहोल टाळा, कारण ते निर्जलीकरण वाढवतात.
दुपारच्या उन्हात बाहेर पडू नका
सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. काम असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा.
हलके आणि सुटसुटीत कपडे घाला
फिकट रंगाचे, सुती (कॉटन) आणि सैल कपडे परिधान करा. डोक्यावर टोपी, छत्री किंवा स्कार्फ वापरा. सनस्क्रीन लावा.
हलका आहार घ्या
तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळे (खरबूज, काकडी, डाळिंब, केळी), सॅलड आणि हलके जेवण घ्या.
घर थंड ठेवा
पंखे, थंड पाण्याने आंघोळ किंवा ओले टॉवेल वापरा. एसी असल्यास जास्त थंड ठेवू नका.
विशेष काळजी घ्या
लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आजारी लोकांना जास्त धोका असतो. त्यांना कधीही बंद गाडीत एकटे सोडू नका.
उष्माघात झाल्यास तातडीने काय करावे?
- व्यक्तीला तातडीने थंड आणि सावलीच्या ठिकाणी न्या.
- ओले कपडे किंवा थंड पाण्याने शरीर पुसा/धुवा. काखा, मान, मांडीच्या मुळाशी बर्फाचे पॅक लावा.
- पाणी किंवा ORS पाजा (बेशुद्ध असल्यास जबरदस्ती करू नका).
- ताबडतोब जवळच्या रुग्णालयात न्या.उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.






