१) जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर? राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. मात्र, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने अडचण निर्माण झालीय. सोलापूर जिल्ह्यातील कैलास गोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत जिल्हा परिषदांनाही ५० टक्के आरक्षणाची अट शिथिल करण्याची मागणी केलीय. त्यावर सोमवारी सरन्यायाधिश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून, न्यायालयाच्या निर्णयावर झेडपी निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. २) मुंबईसाठी महायुतीचा वचननामा जाहीर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मुंबईकरांसाठी ८७ मोठ्या घोषणांचा वचननामा जाहीर केलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थितीत होते. या वचननाम्यात संपूर्ण मुंबईला २४ तास पाणीपुरवठा, पुढील पाच वर्षे पाणीपट्टी स्थिर ठेवण्याचे आश्वासन देण्यात आलंय. तसेच बेस्ट बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, बस ताफा १० हजारांपर्यंत वाढवणे आणि २०२९ पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याची घोषणा करण्यात आलीय. पायाभूत सुविधांसाठी काँक्रिटीकरण, पार्किंग, पूरनियंत्रण, पर्यावरण संरक्षणावर भर देण्यात आलाय. महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, पाळणाघरे, सुरक्षा योजना तर मराठी भाषा-संस्कृती संवर्धनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचे आश्वासन महायुतीनं दिलंय . ३) अपघातात जवानांचा मृत्यू, सातारा हळहळला सातारा जिल्ह्यातील आरे-दरे (ता. सातारा) येथील सीमा सुरक्षा दलातील जवान प्रमोद परशराम जाधव (वय ३२) यांचा शुक्रवारी रात्री भीषण अपघातात मृत्यू झाला. भिक्षेकरी गृहाजवळ टेंपो आणि दुचाकीच्या धडकेत हा अपघात झाला. पत्नीच्या प्रसूतीसाठी सुटीवर गावी आलेले प्रमोद जाधव रात्री साताऱ्याकडे जात असताना हा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूपूर्वीच त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. अवघ्या आठ तासांच्या बाळासह पत्नी स्ट्रेचरवर येऊन जवानाच्या चितेला अग्नी दिला, हे दृश्य पाहून सातारा हळहळला. शनिवारी दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ४) मी १० वर्षे तुमच्या नादाला लागलोय; पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचले “माझ्या नादाला कोणी लागू नये, नाहीतर बघून घेईन, अशा धमक्या दिल्या जातात. पण मी गेली दहा वर्षे तुमच्या नादाला लागलोय, तुम्ही माझं काय केलं?” असा सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबीयांना पुन्हा एकदा डिवचले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. पिंपरी-चिंचवड महापालिका ही ‘सोन्याचं अंडं देणारी कोंबडी’ असल्याने राष्ट्रवादीचा या शहरावरच डोळा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य करत असल्याचा उल्लेख करत, “लांडगे वाघ आहे, एकच पंजा पुरेसा आहे,” असा इशाराही गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना दिलाय. ५) सावधान! इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा जगभरातील इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा वाजलीय. एका सायबर-इंटेलिजन्स अहवालानुसार सुमारे १७ दशलक्ष इन्स्टाग्राम खात्यांची माहिती डार्क वेबवर लीक झालीय. या डेटामध्ये ईमेल आयडी, फोन नंबर आणि प्रोफाइल तपशीलांचा समावेश असल्याचा दावा करण्यात येतोय. ही माहिती वापरून सायबर ठग फिशिंग, खाते हॅकिंग, ओळख फसवणूक आणि आर्थिक घोटाळे करत आहेत. सर्व खाती हॅक झाली आहेत असे नाही, मात्र धोका वाढलाय. तज्ज्ञांनी वापरकर्त्यांना पासवर्ड तात्काळ बदलण्याचा, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवण्याचा सल्ला दिलाय. संशयास्पद लिंक, डीएम किंवा ईमेलवर क्लिक करू नये, लॉगिन अॅक्टिव्हिटी तपासावी आणि अज्ञात डिव्हाइसवरून लॉगआउट करण्याचे आवाहन करण्यात आलंय. ६) पुण्यात Mahindra ची भविष्यातील झलक Mahindra & Mahindra ने आज पुण्यातील Residency Club येथे आपल्या तीन power-packed SUVs – XUV 7XO, BE 6 Formula-E Edition आणि XEV 9S – यांचं grand launch केलं. या कार्यक्रमाला Colonel संभाजी पाटील आणि Captain Ravi Nair यांची प्रमुख उपस्थिती होती. Mahindra च्या senior leadership कडून दीपप्रज्वलन करत या futuristic SUVs सादर करण्यात आल्या. नवी XUV 7XO – The New Legend ही petrol-diesel SUV, triple screen cockpit, Dolby Atmos, ADAS Level-2 आणि advanced software-defined technology सह येते. याची starting price आहे ₹13.66 lakh. तर भारताची पहिली true 7-seater electric SUV – XEV 9S, INGLO platform वर आधारित असून, 59 आणि 79 kWh battery options, panoramic sunroof आणि premium Harman Kardon sound system सह येते. Starting price ₹19.95 lakh. युवांसाठी खास डिझाइन केलेली BE 6 Formula-E Edition, एक sporty electric SUV असून, 556 ते 682 किलोमीटर range आणि फक्त 20 मिनिटांत fast charging सपोर्ट देते. Starting price ₹23.69 lakh. या तिन्ही SUVs ची Pune bookings 14 January 2026 पासून सुरू होणार असून, ग्राहकांनी आपल्या जवळच्या Mahindra dealership ला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलय. ७) त्रिपुरातील कुमारघाट येथे इंटरनेट बंद त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट उपविभागात जातीय तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने कडक पावले उचललीत. वर्गणीच्या वादातून सुरू झालेला संघर्ष हिंसक वळणावर गेला असून जाळपोळ आणि दगडफेकीत किमान पाच ते सहा जण जखमी झालेत. काही घरे, दुकाने आणि एका धार्मिक स्थळाचे नुकसान झालेय. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३ लागू करण्यात आले असून ४८ तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून परिसरात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करून ध्वज मार्च काढण्यात आलाय. राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सतर्क आहे. ८ ) ट्रम्प यांनी ग्रीनलँडकडे वळवला मोर्चा व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने थेट राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेत नेल्याने जागतिक पातळीवर तीव्र तणाव निर्माण झालाय. चीन आणि रशियाने अमेरिकेविरोधात उघड भूमिका घेत मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तात्काळ सुटका करण्याची मागणी केलीय. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडकडे आपला मोर्चा वळवलाय. ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी सैन्यदलाला योजना तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आलीय. मात्र, अमेरिकन सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय. डेली मेलच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचे सल्लागार ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहेत. व्हेनेझुएलानंतर ग्रीनलँडवर मोर्चा वळवण्याच्या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. ९) ‘तान्हाजी’ सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? अभिनेता अजय देवगणच्या २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला होता. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा मांडणाऱ्या या सिनेमाला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केलीय. “गड आला पण सिंह गेला… पण कथा अजून संपलेली नाही,” असे कॅप्शन देत त्याने सीक्वलची हिंट दिलीय. यामुळे ‘तान्हाजी’च्या पुढील भागाबाबत चर्चांना उधाण आलंय. अभिनेता शरद केळकरनेही पोस्ट शेअर करत सिनेमाला सहा वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केलाय. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात काजोल, सैफ अली खान यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. ‘तान्हाजी’ने बॉक्स ऑफिसवर जगभरात सुमारे ३६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. १०) एलिस पेरीने बाबर आझमला प्रपोज केल्याचा फोटो बनावट सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिस पेरी आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांचा एक फोटो तुफान व्हायरल होतोय. यात पेरी बाबरला लग्नासाठी प्रपोज करत असल्याचा दावा केला जातोय.मात्र, पडताळणीत हा फोटो AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) द्वारे तयार केलेला असल्याचे स्पष्ट झालेय. ज्यावेळी ही घटना घडल्याचा दावा केला गेला, तेव्हा पेरी न्यूझीलंडमध्ये तर बाबर ऑस्ट्रेलियात सामने खेळत होता. कोणत्याही अधिकृत सूत्राने या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे, केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी बनवण्यात आलेला हा फोटो पूर्णपणे फेक असल्याचे सिद्ध झालेय.