Ashok Kharat : नाशिक येथील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ, ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात (Ashok Kharat) यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणात राजकीय कनेक्शन आणि एन्काऊंटरचा धक्कादायक दावा समोर आला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरातचा (Ashok Kharat) २४ मार्च रोजी एन्काऊंटर होण्याची दाट शक्यता असल्याचा हादरवणारा दावा केला आहे. महिला नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ Ashok Kharat Case तृप्ती देसाई यांनी सांगितले की, अनेक मंत्री आणि बड्या राजकीय नेत्यांची महत्त्वाची माहिती खरातकडे असण्याची शक्यता आहे. काही पीडितांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे, हे संबंध उघड होऊ नयेत म्हणून खरातला कायमचा संपवण्याचा कट रचला जात असल्याचा संशय आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ लक्ष घालून या एन्काऊंटरच्या कटाला हाणून पाडण्याची मागणी केली आहे. “अनेक मोठे हात या कटात गुंतले असून, प्रकरण दडपण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे,” असे देसाई म्हणाल्या. खरात (Ashok Kharat) प्रकरणात आधीच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पहिली ‘विकेट’ पडली आहे. खरातसोबतच्या फोटो, पाद्यपूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांच्या टीकेमुळे चाकणकर यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तृप्ती देसाई यांनी यासंदर्भातही चाकणकर यांच्या पाठीमागच्या अडचणी वाढत असल्याचे सांगितले. दरम्यान, माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात खरातने राहाता तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित लोकांचे शोषण केल्याचे म्हटले आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने अनेकजण समोर येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचवेळी सुजय विखे पाटील यांनी स्वतःचा खरातशी कधीही संबंध नसल्याचे, त्याला भेटले नसल्याचे आणि बोलणे झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, पोलिस तपास सुरू असून लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तृप्ती देसाई यांच्या दाव्यामुळे (Ashok Kharat) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.