मुंबई – ‘अंगूरी भाभी’ अर्थात ‘भाभी जी घर पर है’ ची अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्याशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. शुभांगी लग्नाच्या 19 वर्षानंतर पती पियुष पुरेपासून विभक्त होत आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघे जवळपास एक वर्ष एकत्र राहत नव्हते. परस्पर विसंवादामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. शुभांगी आणि पियुषचे लग्न 2003 मध्ये इंदूरमध्ये झाले होते. दोघांना एक मुलगी आशी आहे. पियुष डिजिटल मार्केटिंगमध्ये व्यवसाय करतोय. यापूर्वी, शुभांगीने खुलासा केला होता की तिच्या पतीने तिला नेहमीच पाठिंबा दिला आणि तिची कारकीर्द घडवण्यात मदत केली. आता दोघांच्या नात्यात फरक पडला असून दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. याविषयी बोलताना शुभांगीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने तिचे लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण ती त्यांच्यातील मतभेद दूर करू शकली नाही. शुभांगीने हे देखील उघड केले की तिने आणि पियुषने संयुक्तपणे त्यांची 18 वर्षांची मुलगी आशीसाठी कोणताही राग न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तो सदैव पाठीशी उभा राहील, कारण मुलीला आई आणि वडील दोघांचे प्रेम मिळाले पाहिजे. आशी तिच्या आईसोबत राहते आणि पियुष दर रविवारी तिला भेटायला जातो.