नगर – नगर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यात बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण मुंबई, पुण्यासारख्या शहारांतून येत आहेत. ही संख्या धोकादायकस्थितीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नागरीकांना आता प्रचंड दक्ष राहून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
भवानीनगर परिसरात काल करोनाबाधित रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या दक्षता पथकाने या भागात पाहणी करुन काही उपायोजना केल्या. आमदार संग्राम जगताप यांनी पथकासोबत या भागाची पाहणी करुन त्यांना दक्षतेबाबत सूचना दिल्या. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता नागरीकांच्या सहकार्याची जास्त गरज आहे.
प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियम व अटींचे आता सक्तीने पालन करावे. तरच शहरातील वाढ रोखता येईल, असे जगताप म्हणाले. भवानीनगर परिसरात करोनाबाधित आढळल्याने त्या परिसरात आज भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप, आयुक्त श्रीकांत मायकलवार, महापालिका शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी या भागाची पाहणी करुन उपाययोजना केल्या. बाबासाहेब गाडळकर, मळू गाडळकर, संतोष सूर्यवंशी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, हा परिसर कॅन्टेंन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा भाग सील करण्यात येणार आहे. तसेच या परिसरात आता औषध फवारणी करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.