बाजार समितीच्या 18 जागांसाठी 228 उमेदवारी अर्ज

नगर – जिल्ह्यात होवू घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी झुंबड उडाली होती. नगर कृषि उत्पन्न बाजार समितीत 18 जागांसाठी तब्बल 228 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास घोडचोर यांनी दिली.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यंदा प्रथमच इच्छुकांची मोठी संख्या दिसून येत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे नगर तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या स्नुषा सुप्रिया अमोल कोतकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे पुतने संदीप कर्डिले, माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके, माजी सभापती अभिलाष घेगे, माजी उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, दीपक कार्ले, सुधीर लामखडे, बाबा खर्से, भाऊसाहेब बोठे, सनी लांडगे, गुलाब शिंदे, राजु आंधाळे, सत्यभामा कुलट, उद्धव दुसुंगे, रामदास सोनवणे, विजय शेवाळे, गोरख काळे, संजय जपकर, दिलीप भालसिंग, नंदकिशोर शिकारे, संजय गिरवले, बहिरु कोतकर, विशाल निमसे, रेश्मा चोभे यांच्यासह तालुक्यातील अनेक दिग्गजांनी उनेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणुक होत आहे. गेल्या 15 वर्षांपासून माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता होती. कर्डिले व कोतकर गट आणि प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी यावेळी महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात येणार आहे. कर्डिले यांच्या मदतीला खासदार विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तर महाविकास आघाडीच्या बाजूने आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप पाहावयास मिळणार आहेत. दरम्यान, अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होइल.





