Accident : खानापूर–स्वारगेट प्रवास करणाऱ्या बसमधून तरुणी अचानक रस्त्यावर पडली; अन् घडलं भयानक…
Accident : सिंहगड रस्त्यावर भीषण अपघात

पुणे : सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी दोन बसच्या अपघातात २५ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खानापूरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसमधून प्रवास करणारी तरुणी बसच्या पुढील दरवाजातून अचानक रस्त्यावर पडली. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या शाळेच्या बसच्या चाकाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हा अपघात सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी सुमारे ९ वाजून ४६ मिनिटांनी सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेलच्या समोर, स्वारगेटकडे जाणाऱ्या मार्गावर, वूड प्लाझा दुकानासमोर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन बळवंत खड्डा (वय २५, रा. कृष्णा वसतिगृह, संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेचा परिसर, गिरीनगर, खडकवासला, पुणे) या खानापूर ते स्वारगेट जाणाऱ्या प्रवासी बसमधून प्रवास करीत होत्या. बसचा क्रमांक एमएच १२ आरएन ९०७४ आहे.
बस सिंहगड रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जात असताना कांचन या बसच्या पुढील दरवाजातून खाली पडल्या.
अंगावरून शाळेच्या बसचे चाक गेल्याने मृत्यू
त्याचवेळी एमएच १२ यूएम ६३३९ क्रमांकाची शाळेची बस तेथून जात होती. रस्त्यावर पडलेल्या कांचन यांच्या अंगावरून शाळेच्या बसचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करून कांचन यांना उपचारासाठी जगताप रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातातील दोन्ही बसचालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून दोन्ही चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
घटनेचा तपास सुरू
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. बसमधून तरुणी नेमक्या कोणत्या कारणामुळे खाली पडल्या, त्यावेळी दोन्ही बसची स्थिती काय होती, तसेच चालकांकडून काही निष्काळजीपणा झाला का, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, घटनास्थळावरील परिस्थिती आणि वाहनचालकांची माहिती यांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे. सिंहगड रस्त्यावर सकाळच्या वेळेत घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
हेही वाचा:
Drishyam 3 : प्रतिक्षा संपली! ‘दृश्यम 3’ची रिलीज डेट जाहीर; तारखेसोबत खास कनेक्शन





