प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा आम्ही गाठणार असून, आम्हास इतर कोणत्या पक्षाची गरजच भासणार नसल्याचा दावाही पवार यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी आमदार विलास लांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या हमीपत्रानुसार दिलेली वचने आम्ही पूर्ण करणार आहोत. यामध्ये मेट्रो आणि पीएमपीएमएल बसचा प्रवास सर्वांसाठी मोफत देणार आहे. मात्र, विरोधकांकडून हे शक्य नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मोफत प्रवासाचे वचन देताना तज्ज्ञ, अभ्यासकांशी चर्चा केली आहे. मोफत प्रवास उपलब्ध करून देणे हा निर्णय सर्वस्वी पालिकेच्या अख्यत्यारीतील आहे. त्यासाठी केंद्र शासन अथवा राज्य शासनाकडे जावे लागणार नाही. राज्याचा अर्थसंकल्प मी 11 वेळा मांडला आहे. त्यामुळे जमा- खर्च हे गणित मला चांगले समजते. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोमधून प्रवास करण्यास नागरिक प्राध्यान्य देतात. याच काळात मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळतो. मोफत प्रवास दिल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नागरिक प्राधान्य देतील. प्रवासी संख्येवरून नंतर मेट्रोला रीपेमेंट करता येणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.अजित पवार यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे आश्वासन दिले होते; पण आता ते शब्द पाळत नाहीत, अशी टीका भाजपने केल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले. की जेव्हा मी लढतो तेव्हा ती मैत्रीपूर्ण लढत कशी असेल? दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण नाही या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार का आणि सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार का, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, की दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही आणि सुप्रिया सुळे केंद्रामध्ये इंडिया आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे त्या मंत्रीही होणार नाहीत.