Pune News – शहरातील नन्हे परिसरात प्राणिमित्रांना हादरवून टाकणारी घटना घडली असून, एका कंपनीसमोर झोपणाऱ्या ‘नन्या’ नावाच्या भटक्या श्वानाला अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नन्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लता गज्जर ( ५९) व प्रीती पवार या गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या श्वानांची सेवा करत आहेत. ‘प्राणीमित्र अॅनिमल वेल्फेअर फाउंडेशन’च्या माध्यमातून त्या परिसरातील सुमारे ६० भटक्या श्वानांना दररोज अन्न देतात. नन्हे येथील ‘कुतूहल सायन्स अॅक्टिव्हिटीस प्रा. लि.’ या कंपनीचे संचालक सुयश ठाके यांनी या कार्यकर्त्यांकडून २०२९ मध्ये दोन भटके श्वान सांभाळण्यासाठी घेतले होते. कंपनीने गेली सात वर्षे त्या श्वानांची योग्य काळजी घेतली होती. त्यांचे लसीकरण व निर्बीजीकरणही करण्यात आले होते. दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ३ वाजता एक पांढरी ‘इको’ गाडी कंपनीसमोरील गल्लीत आली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, गाडीतून उतरलेल्या दोन व्यक्तींनी अन्नाचे आमिष दाखवून ‘नन्या’ नावाच्या नर कुत्र्याला जवळ बोलावले आणि त्याला जबरदस्तीने गाडीत टाकून पळ काढला. ‘नन्या’ हा कंपनीतील कर्मचाऱ्यांचा अत्यंत लाडका व प्रेमळ कुत्रा होता. तो नियमित लसीकरण झालेला असल्याने कोणालाही धोका नव्हता. त्यामुळे त्याचे अशा प्रकारे अपहरण झाल्याने परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असले तरी गाडीचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याने आरोपींचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. प्राणिमित्रांनी या घटनेला प्राण्यांवरील क्रूरतेचा प्रकार असल्याचे सांगत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारदारांनी पोलिसांना विनंती केली आहे की, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गुन्हा नोंदवावा, आरोपींना शोधून ‘नन्या’ला सुरक्षित परत आणावे आणि दोषींना कायद्यानुसार शिक्षा द्यावी.