Shivneri Bus – मुंबई- पुणे महामार्गावर अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित प्रवाशासाठी ‘शिवनेरी’ बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. आता मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी धावणार असून, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भापर्यंत शिवनेरीचा आरामदायी आणि वातानूकुलित प्रवास सुरू होणार आहे. पुणे-मुंबई-पुणे महामार्गाची राणी म्हणून ओळख मिळवलेली शिवनेरी बस स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून धावते. नोकरी, व्यावसायिकांसह पर्यटन आणि कामानिमित्त पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या बसला अधिक पसंती आहे. त्यामुळे इतर बससेवेपेक्षा तिकीट दर थोडे अधिक असूनही ही सेवा नफ्यात असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. आता या शिवनेरीचा लाभ राज्यातील काही प्रमुख शहरांना मिळणार असून, त्यासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या येताच मुंबई-पुणे प्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिवनेरी सेवा सुरू होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. नवीन शिवनेरी बस नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे या मराठवाड्यासह विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आता अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. दरम्यान ई-बस सेवेलाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, दादर-स्वारगेट, दादर-शिवाजीनगर, बोरीवली-स्वारगेट, बोरीवली-शिवाजीनगर, ठाणे-स्वारगेट आणि ठाणे-शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बससेवा सुरू आहे. असे असतील नवीन शिवनेरी मार्ग * नाशिक-पुणे * पुणे-कोल्हापूर * पुणे-सांगली * पुणे-सोलापूर * नाशिक-छत्रपती संभाजीनगर, * नाशिक-जळगाव-धुळे * नागपूर-चंद्रपूर * नागपूर-अमरावती-अकोला ३० स्लिपर शिवनेरीची भर नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी स्लिपर शिवनेरी सुरू करून प्रवासी सेवा अधिक बळकट करण्यात येणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.