Pune Sinhagad Fort : पुण्यातील अग्रगण्य विश्वकर्मा विद्यापीठाच्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी १३ एप्रिल रोजी किल्ले सिंहगडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले. ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांनी किल्ल्यावरील विविध महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवला. या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी किल्ल्यावरील दारूगोळा साठवणूक स्थळ, छत्रपती राजाराम महाराज समाधी, नरवीर तानाजी महाराज समाधी तसेच देवटाके या ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता केली. या उपक्रमामुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याबरोबरच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हेही वाचा – Pune: खानवडी शाळा प्रकरणी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे निलंबित स्वच्छता मोहिमेसोबतच विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याचा इतिहास, सिंहगड किल्ल्याचे धोरणात्मक महत्त्व आणि येथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्थळावर इतिहास अनुभवण्याची संधी मिळाली. या उपक्रमाबाबत प्रा. शेखर पायगुडे यांनी सांगितले की, “पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना इतिहासाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता राखण्याची जाणीव निर्माण व्हावी, तसेच पर्यटन क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांची ओळख व्हावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.” या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांद्वारे ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.