Pune News – संगणकीय प्रणालीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी भूमिअभिलेख आणि महसूल विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा गुरुवार दि. २ एप्रिल ते रविवार दि. ५ एप्रिल २०२६ दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक कामामुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड आणि इतर ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. दि. २ दि. ५ एप्रिल या कालावधीत महाभूमी पोर्टल आणि भूमिअभिलेख विभागाच्या डिजिटल सात- बारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची क प्रत मिळवणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या प्रमुख सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाने म्हटले आहे. नागरिकांची गैरसोय सध्या काळात नागरिक डिजिटल सातबारे उतारे घेत आहेत. सलग चार दिवस या ऑनलाइन सेवा बंद राहणार असल्याची माहिती नागरिकांना आधीच चार ते पाच दिवस देणे अपेक्षित असताना भूमिअभिलेख विभागाने याबाबतची जाहीर नोटीस आज वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नागरिकांना जमिनीचे खरेदी- विक्री व्यवहार, बँकेचे कर्ज किंवा इतर कामांसाठी तातडीने डिजिटल स्वाक्षरीचे उतारे हवे आहेत, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यांना आता चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.