Pune Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात थरार! पाचव्या मजल्याच्या जाळीवर बसून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Pune Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी निर्माण झाला तणाव; आपल्या मागणीसाठी पाचव्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर बसला तरुण.
Updated On:

Pune Collector Office – जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या इराद्याने पाचव्या मजल्यावरील जाळीवर चढल्याने काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या माहितीनुसार, राम शिवाजी पाचकाळे ( ३०, रा. भोर, पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र प्रकरणात दखलपात्र गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.
मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर बसून आंदोलन सुरू केले. यामुळे कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच अग्निशमन दलाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर राम पाचकाळे यांचे समाधान झाले. यानंतर आंदोलन मागे घेत ते खाली उतरले. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेले.





