Mahila Congress Protest : “आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्चा खाली करा!” पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक
Mahila Congress Protest : बालगंधर्व चौकात पुणे शहर महिला काँग्रेसचे जोरदार निदर्शन; २०२३ च्या आरक्षण विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी.

Mahila Congress Protest – भारतीय जनता पक्षाने खोटा प्रचार बंद करून संसदेने २०२३ मध्ये मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन करण्यात आले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात नगरसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव,
प्रियांका रणपिसे, अंजली सोलापुरे, नयना सोनार, रेखा जैन, ॲड.अंजली देसाई, कनहर आदरखान, ॲड. राजश्री दामले-चव्हाण, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, मनीषा धेंडे, ऋग्वेदी सपकाळ, सुमन सूर्यवंशी, पूजा सपकाळ, सुरेखा मारणे, पौर्णिमा नाईकमोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
भाजप हटाओ, महिला आरक्षण बचाओ, आरक्षणावर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो, महिला आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्चा खाली करा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचे., आदी घोषणांचे फलक महिला आंदोलकांनी हातात घेतले होते.
महिला आरक्षणाचे श्रेय उपटण्याचा मोदी सरकारचा खटाटोप केविलवाणा आहे. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यापूर्वीच घेतला असून, महापालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत फिरू नये, अशा शब्दांत स्वाती शिंदे यांनी भाजपवर टीका केली.





