Shirur News : शिंदोडीत डाळिंबाच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला; 80 हजारांच्या डाळिबांची चोरी
शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने (Shirur News) तब्बल ८०० किलो ‘सुपर भगवा’ जातीची डाळिंबे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

Shirur News : शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने (Shirur News) तब्बल ८०० किलो ‘सुपर भगवा’ जातीची डाळिंबे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
चोरीला गेलेल्या डाळिंबांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असून, या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (Shirur News) दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजाराम भानुदास ओव्हाळ (वय ४२, रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हाळ यांची शिंदोडी गावच्या हद्दीतील गट क्रमांक १०६/२ मध्ये डाळिंबाची बाग आहे. या बागेत त्यांनी ‘सुपर भगवा’ जातीच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले होते. १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी 8:30 वाजल्यापासून ते १४ जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बागेत प्रवेश केला. चोरट्याने बागेतील सुमारे ८०० किलो डाळिंबे तोडून चोरुन नेली.
बाजारभावानुसार प्रतिकिलो १०० रुपये दराने चोरीला गेलेल्या डाळिंबांची एकूण किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी बागेत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात (Shirur News) डाळिंबे गायब असल्याचे ओव्हाळ यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मालाचा अथवा चोरट्याचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरुन शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद मोरे हे करीत असुन, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा शोध सुरु आहे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…
शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत असताना डाळिंबाच्या बागेतून थेट तयार माल चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेक महिने मेहनत घेऊन तयार केलेला शेतमाल एका रात्रीत चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात शेतमाल चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
वर्षभरापुर्वीच्या चोरीचा अजुनही तपास नाही…
शिंदोडीत यापुर्वीही एक वर्षभरापुर्वी शहाजी वाळुंज यांच्या शेतातुन (Shirur News) डाळिंबाची चोरी झाली होती. परंतु वर्ष उलटूनही या चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत रोहित्रातील तांब्याच्या कॉईल चोरी, ऑईल चोरी तसेच डाळिंब चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना पोलिस नक्की काय करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.






