Baramati: बारामतीत पक्षबांधणीला वेग; ‘विलीनीकरण होणार नाही’, युगेंद्र पवार यांची स्पष्ट भूमिका
Baramati: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत.”

Baramati: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पक्षातील नियुक्त्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत “विलीनीकरण आता होणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
बारामतीत पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, “पवार साहेबांनी वाय बी सेंटर येथे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सर्व नियुक्त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आम्ही काम सुरू केले आहे.”
‘पवार विरुद्ध पवार’ लढतीवर सावध भूमिका –
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ अशीच लढत होणार का, या प्रश्नावर त्यांनी सावध भूमिका घेतली. “२०२९ ला अजून तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. एका वर्षातही राजकारणात खूप काही बदलू शकते. २०२८ मध्ये मला हा प्रश्न विचारा, तेव्हा मी स्पष्ट सांगू शकेन,” असे ते म्हणाले.
पक्षात अपेक्षित पद न मिळाल्याबाबत बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. “ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांनाही मोठी पदे मिळाली. कदाचित माझ्याच अपेक्षा चुकीच्या असतील. मात्र पद न मिळणे माझ्या फायद्याचे ठरले. त्यामुळे मला लोकांमध्ये जास्त वेळ देता आला,” असे सांगत त्यांनी पदापेक्षा जनसंपर्काला अधिक महत्त्व दिल्याचे स्पष्ट केले.
लोक निश्चितच आमच्यासोबत येतील –
राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावा केला. “कांद्याला दर नाही, लोडशेडिंग सुरू आहे, पाणीटंचाई आहे. बारामतीत गुन्हेगारी वाढत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर झाला आहे,” असे ते म्हणाले. “सत्ता नसतानाही आम्ही लोकांची कामे करत राहिलो, तर लोक निश्चितच आमच्यासोबत येतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विलीनीकरण होणार नाही –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत.”
विलीनीकरण झाल्यास स्वतःचे राजकीय नुकसान झाले असते का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, “जर विलीनीकरण झाले असते, तर पवार साहेब आणि अजितदादा माझी नक्की काळजी घेतले असते, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”





