Pune District : वाघोलीतील कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार
Pune District : नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

वाघोली : वाघोली परिसरातील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. लोहगाव रोड ते कावेरी नाला दरम्यानच्या सुमारे 8 कोटी रुपयांच्या ड्रेनेज लाईन प्रकल्पासाठी 59. 50 लाख रुपयांचा मास्टर प्लॅन मंजूर करण्यात आला असून, संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
वाघेश्वर नगर परिसरातील सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा आढावा घेत पावसाळी पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणे आणि घाणीच्या समस्या टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, वाढत्या कचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य निरीक्षक आणि प्रभाग क्रमांक 3 व 4 च्या मुकादमांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. कचरा संकलन गाड्यांचे नियोजन, नियमितता आणि कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक रामभाऊ दाभाडे, नगरसेवक अनिल सातव, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, माजी उपसरपंच संदीप सातव तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.





