Indapur Farmers Protest : शेळ्या-मेंढ्यांसह पाटबंधारे कार्यालयावर धडकणार! इंदापूरच्या शेतकऱ्यांचा सज्जड इशारा
Indapur Farmers Protest : खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण दाबाने न मिळाल्यास जनावरांसह पाटबंधारे कार्यालयावर धडकणार; रुई, न्हावी आणि कौठळी येथील शेतकऱ्यांचा सज्जड इशारा.

Indapur Farmers Protest – रवी हिरवागार दिसणारा आमचा परिसर तीव्र टंचाईमुळे करपून गेला आहे. शेतात एक काडी टाकली तरी संपूर्ण शिवार जळून खाक होईल अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत येत्या एक ते दोन दिवसांत खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण दाबाने मिळाले नाही, तर मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर शेळ्या, मेंढ्या आणि जनावरांसह धडक मोर्चा काढण्यात येईल,” असा सज्जड इशारा रुई, न्हावी आणि कौठळी येथील शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील रुई (बाबीर) गडावर शनिवारी (दि. १६) सकाळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. हक्काचे सिंचनाचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट खडकवासला कालव्याच्या कॅनाॅलमध्ये उतरून पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. “आता पाणी मिळाले नाही, तर यापुढील आंदोलन प्रशासनाला झेपणार नाही,” असा आक्रमक पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.
शेतकऱ्यांनी प्रशासनावर आरोप करताना सांगितले की, वारंवार मागण्या करूनही पाटबंधारे विभागाकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात आहेत. नियोजित वेळेत पाणी न सुटल्यामुळे ऊस, भाजीपाला आणि इतर उभी पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत. पिकांचा प्रश्न तर गंभीर आहेच, पण आता माणसांना आणि जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी मिळणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कालवा परिसर दणाणून सोडला. “आमच्या हक्काचे पाणी तात्काळ मिळाले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे संबंधित प्रशासनच जबाबदार राहील,” असा इशारा उपस्थित आंदोलकांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या –
“टेल टू हेड” पाणी वाटप व्हावे, शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा,मागील तालुक्यातील पाणी पुर्ण बंद करून इंदापूर तालुक्याला पुर्ण दाबाने पाणी मिळावे अशा मागण्या या वेळी आंदोलकांनी केल्या.






