Dilip Walse Patil : आंबेगावात अधिकाऱ्यांची मेहेरबानी चालणार नाही! वळसे पाटलांच्या ‘त्या’ आदेशामुळे प्रशासनात खळबळ
Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तत्परतेने मार्गी लावण्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रशासनाला सक्त निर्देश.

Dilip Walse Patil – आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय कामकाजात उदासीनता दिसून येत असून, नागरिकांची प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. पंचायत समिती घोडेगाव येथे आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे, पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, माजी सभापती संजय गवारी, सदस्य अंकिता वाळुंज, उषा कानडे, निलेश टेमकर, शिवाजी निघोट यांच्यासह प्रांत अधिकारी अर्चना तांबे,
तहसीलदार डॉ. सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले की, मागील आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी काय झाली, याचा सविस्तर अहवाल सादर करावा. प्रत्येक बैठकीनंतर कार्यवाही (प्रोसिडिंग) तयार करून पुढील बैठकीत त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक विभागाने आपापल्या कामांचा प्रामाणिक आढावा देत अडचणी स्पष्टपणे मांडाव्यात. तसेच, प्रशासकीय बैठकीत औपचारिकतेपेक्षा कामाला प्राधान्य द्या. स्वागत, फुले, रांगोळी यावर वेळ घालवू नका. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकार्यांना काही अडचणी असल्यास त्या जाहीरपणे किंवा खाजगीत मांडाव्यात, त्यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीसाठी निमंत्रित अधिकार्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे सांगत, अन्य व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून पाठवू नका. अत्यावश्यक कारण असल्यासच लेखी अर्ज द्या, अशी सूचना त्यांनी केली. नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि तालुक्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करणे यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.





