Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर कारखान्याकडून ऊस लागवड धोरण जाहीर; कोणत्या जातींना मिळाली परवानगी? पाहा
Bhimashankar Sugar Factory : माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाचा निर्णय; २५ मे पासून नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू.

Bhimashankar Sugar Factory – पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२६-२७ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी २५ मे पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, ऊस लागवडीसाठी २५ मे २०२६ ते ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम. ०२६५ आणि दि. २५ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत को.८६०३२ उस लागवडीस व नोंदीस परवानगी दिलेली आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत व्हि.एस.आय. ०८००५ ऊस लागवडीस,
दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत एम.एस.१०००१, फुले ९०५७ ऊस लागवडीस तसेच दि.१ जून २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत को.व्हि.एस.आय.१८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम.११०८२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. २५ मे २०२६ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि. २५ जून २०२६ पर्यंत कधीही लागवड केलेल्या ऊस रोपांची ऊस नोंद दि. २५ मे २०२६ नोंद तारीख राहील. त्यानंतर रोपांपासून ऊस लागवड केलेल्या उसाची नोंद १ महिना अगोदर केली जाईल व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहे.
त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पुर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येवून ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल.






