पुणे – एसटी चालक आणि वाहकांना मारहाण करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, काही नागरिकांकडून मारहाण करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चालक, वाहकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत गेल्या तीन महिन्यांत अशी मारहाण करणाऱ्या दहा जणांविरोधात एसटी महामंडळाने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्याशिवाय अशा प्रकारचे खटले चालविण्यासाठी संबंधित वाहक आणि चालकांना महामंडळाच्या खर्चाने वकिल देण्यात येणार आहे.
एसटीच्या चालक आणि वाहकांना नागरिकांकडून किरकोळ कारणावरुन मारहाण केली जात आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. अखेर काही कामगार संघटनांनी याबाबत उपाध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेऊन रावते यांनी सर्व विभागीय नियत्रंकांना त्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार अशा समाजकंटकांच्या विरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आणि वाहक तसेच चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याशिवाय, या वाहक आणि चालकांना खटले चालविण्यासाठी महामंडळाच्या वतीने वकिल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत चालक आणि वाहकांना मारहाण करणाऱ्या दहा समाजकंटकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याता आले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.