Charholi News: चऱ्होली फाटा परिसरात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा; पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर
अनेक सोसायट्यांना टँकरचा आधार : रहिवाशांवर आर्थिक भार

भोसरी – चऱ्होली फाटा परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच परीसरातील अनेक सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे पाण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करण्यापासून, दैनंदिन वापरासाठीही पाण्याची काटकसर करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. अनेक सोसायट्यांना मोठी रक्कम पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे.
चऱ्होली फाटा परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मोकळ्या जागांवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून, अनेक नवीन गृहप्रकल्पांमुळे लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.
मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची व्यवस्था पुरेशी सक्षम झाली नसल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून होत आहेत. महापालिकेकडून मिळणारे पाणी अपुरे पडत असल्याने सोसायटी व्यवस्थापनांना खासगी टँकर मागवावे लागत आहेत हीया भागची सद्या ची परिस्थिती झाली आहे.
टँकरच्या पाण्यासाठी सोसायट्यांना स्वतंत्र खर्च करावा लागत असून, हा खर्च रहिवाशांच्या मासिक देखभाल शुल्कातून वसूल केला जात आहे. त्यामुळे घरखर्चाबरोबरच पाण्यासाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. काही सोसायट्यांमध्ये पाण्याचा वापर मर्यादित ठेवण्याच्या सूचना रहिवाशांना दिल्या जात असून, वाहन धुणे, बागेला पाणी देणे यांसारख्या कामांवर मर्यादा आणल्या जात आहेत.
वाढत्या बांधकामांना पाणी कुठून देणार?
चऱ्होली परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे सुरू आहेत. नवीन सोसायट्या तयार होत असून, त्यामध्ये नागरिक वास्तव्यास येत आहेत. मात्र, या वाढत्या नागरीकरणासाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभारण्याचे नियोजन कितपत झाले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन बांधकामांना परवानगी देताना भविष्यातील पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या आणि पाण्याच्या स्रोतांचा विचार केला जातो का, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न विचारले जात आहेत.
पावसाचे प्रमाण, धरणांमधील पाणीसाठा आणि शहराची वाढती लोकसंख्या यांचा विचार करता आगामी काळात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
एकीकडे महापालिकेकडून मॅरेथॉनसारख्या विविध कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च केले जात असताना, दुसरीकडे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. कार्यक्रमांबरोबरच पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सुविधांसाठीही आर्थिक तरतूद आणि ठोस नियोजन करावे, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
‘चऱ्होली फाटा परिसरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, उपलब्ध पाण्याचे प्रमाण आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत महापालिकेने स्पष्ट भूमिका मांडावी, टँकरच्या तात्पुरत्या व्यवस्थेऐवजी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करावी.’ – रवी शिंदे, स्थानिक नागरिक.
‘परिसरात अनेक नवीन बांधकामे सुरू असून, नव्या सोसायट्यांमध्ये नागरिक वास्तव्यास येत आहेत. मात्र, या वाढत्या नागरीकरणासाठी आवश्यक पाणीपुरवठा व्यवस्था, जलवाहिन्या आणि पाण्याचे स्रोत यांचे नियोजन होणे गरजेचे आहे.’ – शंतनु ढेकणे, स्थानिक नागरिक.
Vice President C. P. Radhakrishnan: ज्ञान आणि कौशल्याचा वापर राष्ट्र उभारणीसाठी करा…





