SARTHI: सारथीच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – अनिल पवार
SARTHI: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकसंवाद-२०२६

पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी व कुणबी या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षण, कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रात विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांनी व लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी केले.
विनायक मित्र मंडळ, भिडे पूल चौक येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी सारथी संस्थेच्या विविध योजना, उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती नागरिकांना दिली. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सारथीचे अभय पालवणकर, मंडळाचे अध्यक्ष पवन सुपेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सारथी संस्थेमार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, तसेच कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत सारथी संस्थेचे १४० विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून, सुमारे १ हजार १२४ विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
इंडो-जर्मन टूल रूम, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) माध्यमातून कौशल्य विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन, तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
वसतिगृह, अभ्यासिकांचे काम प्रगतिपथावर
सारथी संस्थेच्या माध्यमातून राज्यातील आठ विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी प्रत्येकी ५०० मुलांसाठी व ५०० मुलींसाठी वसतिगृह, तसेच वाचनालय आणि अभ्यासिकांच्या बांधकामाचे काम प्रगतिपथावर आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे.





