MSEDCL: वीजचोरांना महावितरणचा दणका; पिंपरी-भोसरीत ७१४ प्रकरणांत ३.४३ कोटींची दंड आकारणी
१३ लाख युनिट विजेवर चोरांचा डल्ला; १.७६ कोटींची वसुली, १९ जणांविरोधात गुन्हे दाखल

पिंपरी – अधिकृत वीजजोडणी घेऊन नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या तुलनेत अनधिकृत मार्गाने वीज वापरणाऱ्यांचे धाडस वाढत असल्याचे पिंपरी आणि भोसरी विभागातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. महावितरणने केलेल्या कारवाईत दोन्ही विभागांत मिळून तब्बल ७१४ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
या प्रकरणांत १३ लाख ३ हजार ६२८ युनिट विजेची चोरी झाल्याचे समोर आले असून, संबंधितांना ३ कोटी ४३ लाख १० हजार रुपयांची आकारणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ कोटी ७६ लाख ९७ हजार रुपयांची वसुली झाली आहे.
उर्वरित रकमेच्या वसुलीचे आव्हान महावितरणसमोर आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणांपैकी १९ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वीजचोरीचा प्रश्न केवळ आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित नसून, तो कायदा, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारीशीही जोडला गेला आहे.
पिंपरी विभागात वीजचोरीची ४७० प्रकरणे उघडकीस आली असून, त्यामध्ये ८ लाख ५१ हजार युनिट विजेची चोरी झाली आहे. या प्रकरणांत २ कोटी १९ लाख १० हजार रुपयांची आकारणी करण्यात आली असून, १ कोटी १७ लाख ४० हजार रुपयांची वसुली झाली आहे. तसेच ६ लाख ७५ हजार युनिटच्या वसुलीची नोंद आहे.
या विभागात १८८ दंडनीय प्रकरणे नोंदविण्यात आली असून, १० गुन्हे दाखल झाले आहेत. दुसरीकडे, भोसरी विभागात २४४ प्रकरणांत ४ लाख ५२ हजार ६२८ युनिट विजेची चोरी झाल्याचे आढळले.
या प्रकरणांत १ कोटी २४ लाख रुपयांची आकारणी करून ५९ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. येथेही नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही विभागांतील ही आकडेवारी पाहता वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणला तपासणी आणि वसुलीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी लागणार आहे.
वीजचोरीचा परिणाम केवळ महावितरणच्या महसुलावर होत नाही, तर संपूर्ण वीजव्यवस्थेवर होतो. अनधिकृत जोडण्या, मीटरमध्ये फेरफार किंवा थेट वीजवाहिनीवरून घेतलेली जोडणी यामुळे वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी, शॉर्टसर्किट, आग आणि विजेच्या धक्क्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याचा फटका परिसरातील सामान्य नागरिक आणि नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही बसू शकतो. त्यामुळे वीजचोरीविरोधातील कारवाईला नागरिकांच्या सहभागाची जोड मिळणे आवश्यक आहे.
संशयास्पद वीजजोडणी आढळल्यास महावितरणला माहिती देणे, अधिकृत जोडणी घेणे आणि वीजबिल वेळेत भरणे ही प्रत्येक ग्राहकाची जबाबदारी आहे. वीज ही सार्वजनिक सुविधा असून तिचा गैरवापर म्हणजे समाजाच्या सामूहिक हक्कावर घाला आहे. महावितरणची कठोर कारवाई आणि नागरिकांची जागरूकता यांची सांगड घातल्यासच वीजचोरीला प्रभावी आळा बसू शकतो.
वीजचोरी रोखण्यासाठी नागरिकांनी लक्ष द्यावे :
अनधिकृत वीजजोडणी, मीटरमध्ये फेरफार किंवा आकडा टाकून वीज वापरण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास महावितरणला कळवावे.
स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत अधिकृत वीजजोडणीचा वापर करावा आणि वीजबिल नियमित भरून वीजचोरीमुक्त परिसरासाठी सहकार्य करावे.
पिंपरी-भोसरीतील वीजचोरीचे धक्कादायक चित्र!
तपशील| पिंपरी विभाग| भोसरी विभाग
वीजचोरीची प्रकरणे| ४७०| २४४
चोरी झालेली वीज| ८,५१,००० युनिट| ४,५२,६२८ युनिट
दाखल गुन्हे| १०| ९
दोन्ही विभागांची एकूण आकडेवारी
– एकूण वीजचोरीची प्रकरणे : ७१४
– चोरी झालेली वीज : १३,०३,६२८ युनिट
– एकूण आकारणी : ३,४३,१०,००० रुपये
– एकूण वसुली : १,७६,९७,००० रुपये
– दाखल गुन्हे : १९
Rajgurunagar : नोटरी रजिस्टर तपासणीचे काम तालुकास्तरावर विभागून द्या





