Electricity theft in Pimpri – पिंपरी कॅम्पमधील रिव्हर रोड परिसर, बाजारपेठ आणि लगतच्या भागांत वीजचोरीचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महावितरणच्या डी. पी. बॉक्समधून थेट वायर टाकून वीज वापरली जात असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, काही व्यावसायिक आस्थापनांमध्ये चोरीच्या विजेवर एअर कंडिशनर आणि इतर उपकरणे सुरू आहेत. मात्र, या प्रकाराकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रिव्हर रोड परिसरातील अनेक डी. पी. बॉक्स उघड्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यातून थेट वायर टाकून काही दुकाने आणि शोरूमना वीजपुरवठा केला जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेले हे प्रकार संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक व्यापारी भागात काही शोरूममध्ये मोठ्या प्रमाणावर वीज वापर होत असल्याचे दिसते. एसी, लाईटिंग आणि अन्य उपकरणांसाठी अनधिकृत जोडण्यांचा वापर होत असल्याचा आरोप आहे. महावितरणचे पथक कारवाईसाठी गेले, तर काही व्यापारी एकत्र येऊन दबाव टाकतात, अशीही चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे कारवाई अर्धवटच राहते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. महावितरण. दुसरीकडे झोपडपट्टी भागातही वीजचोरीची समांतर व्यवस्था सुरू असल्याचे समोर येत आहे. स्थानिक पातळीवर काही व्यक्ती दरमहा ठराविक रक्कम घेऊन झोपडपट्टी दादा अनधिकृत जोडण्या देत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अधिकृत ग्राहकांवर आर्थिक भार वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. महावितरणने यापूर्वी वीजचोरीविरोधात मोहिमा राबवल्या होत्या. काही भागांत वायर जप्त करण्याची कारवाईही झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा अनधिकृत जोडण्या सुरू झाल्याचे नागरिक सांगत आहेत. नागरिकांनी महावितरणकडे तातडीने विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच डी. पी. बॉक्स सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.