Ganeshotsav 2026: बाप्पा एका आधारावर; ‘बॅलेन्सिंग’ मूर्तींची यंदा क्रेझ
Ganeshotsav 2026: शिल्पकलेसोबत अभियांत्रिकीचा कस; पिंपरी-चिंचवडच्या कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची दिवस-रात्र धावपळ

पिंपरी – गणेशोत्सव जवळ येताच शहरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. यंदा पारंपरिक मूर्तींपेक्षा वेगळ्या संकल्पनांना गणेश मंडळांची पसंती मिळत आहे. त्यात ‘बॅलेन्सिंग मॉडेल’ मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
एका पायावर किंवा छोट्या आधारावर संतुलित केलेल्या या मूर्ती तयार करणे मूर्तिकारांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मात्र, शिल्पकलेची आवड असणारे अनेक कलाकार यासाठी मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांमध्ये अशा मूर्ती घडविण्यासाठी राबत आहेत.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरालगतचे कुंभारवाडे आणि कार्यशाळांमध्ये अंतिम कामाला वेग आला आहे. कुठे लोखंडी सांगाडे तयार केले जात आहेत. कुठे प्लॅस्टरचे काम सुरू आहे. Ganeshotsav 2026
तर काही ठिकाणी मूर्तींच्या रंगकामाला सुरुवात झाली आहे. एकंदरितच गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने सर्वच कामाला लागले आहेत. यंदा मंडळांकडून आकर्षक आणि हटके संकल्पनांना मागणी आहे. नटराज मुद्रा, तांडव रूप, मल्लखांबावरील गणेश, योगासनातील गणेश आणि घोडेस्वार गणेश अशा विविध संकल्पना आकार घेत आहेत. काही मूर्ती अत्यंत कमी आधारावर उभ्या केल्या जात आहेत.
या मूर्तींच्या निर्मितीत केवळ शिल्पकलेचा कस लागत नाही तर अभियांत्रिकी कौशल्यही महत्त्वाचे ठरते. मूर्तीचा गुरुत्वमध्य अचूक साधावा लागतो. भाराचे योग्य नियोजन करावे लागते. लोखंडी सांगाड्याची मजबुती तपासावी लागते. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत मूर्तीचा तोल ढळू नये, याची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी शिल्पकार दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
साच्यातील मूर्तींच्या तुलनेत बॅलेन्सिंग मॉडेलसाठी अधिक वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे त्यांचा खर्चही जास्त असतो. तरीही मंडळांचा उत्साह कायम आहे. वेगळेपणा आणि आकर्षकता यामुळे या मूर्तींना मोठी मागणी आहे. मंडळांची पसंती लक्षात घेता मूर्तिकारही नव्या संकल्पनांना आकार देत आहेत. Ganeshotsav 2026
अनेक मोठ्या मंडळांनी अशा गणेशाच्या मूर्तीची ऑर्डर दिलेली आहे. त्यांना वेळेत मूर्ती देण्यासाठी कुंभारवाडे आणि कार्यशाळांमध्ये लगभग दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील मंडपांमध्ये बाप्पाची कलात्मक आणि साहसी रूपे पाहायला मिळणार आहेत.
शहरात मूर्ती दाखल
शहराच्या अनेक भागांमध्ये गणरायाच्या मूर्तीचे स्टॉल सजले आहेत. त्याठिकाणी अर्धा ते सात फूटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. ते पाहण्यासाठी तसेच आकर्षक मूर्ती बुक करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.
Pimpri Chinchwad : नदी सुधारची लगीनघाई…! इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प





