Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार जितके कडक आणि शिस्तीचे होते, तितकाच त्यांच्या मनाचा हळवेपणा होता. पिंपरी चिंचवड शहर त्यांनी तळहाताच्या फोडासारखं सांभळलं. तसेच शहरातील कार्यकर्ते देखील सांभाळले. कधी रागावून तर कधी प्रेमाने कार्यकर्त्यांना जवळ घेऊन समजावले. सन २०१२ सालच्या निवडणुकीची आठवण म्हणजे कडक अजित दादांच्या मनाच्या हळवा कोपरा दर्शविणारी आहे. तिकीट वाटपाच्या मुलाखतीदरम्यान एका कार्यकर्त्यांने शक्तीप्रदर्शन केल्याने निर्माण झालेल्या गोंधळात एक महिला खाली पडली. हे पाहून अजितदादांचा संताप अनावर झाला. सर्वांदेखत त्या कार्यकर्त्यास दादांच्या प्रचंड रागास सामोरे जावे लागले. अजित दादांनी भर गर्दीत उतरत त्या कार्यकर्त्याची चांगलीच कानउघाडणी केली. नंतर मात्र त्याला जवळ घेत समजावले आणि काही दिवसांनी न मागता स्वीकृत नगरसेवकपदही बहाल केले. अशा पद्धतीने दादा आपल्या कार्यकर्त्यांसोबत वडिलकीचे नाते जपत होते.पिंपरी चिंचवडमध्ये नेहमीच अजित पवारांचा राबता होता. त्यामुळे शहरातील मोठ मोठ्या नेत्यांपासून लहान कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच अजित दादांच्या मागेपुढे करायचे. या सर्वांना न्याय देण्याचे काम अजित दादा करायचे. २०१२ साली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक इच्छुक असल्याने अजित दादांनी मुलाखती घेऊन तिकीट वाटण्याचा निर्णय घेतला. अजित पवार त्यानुसार, चिंचवड गावातील एका मंगल कार्यालयात मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. अनेक इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह आले होते. त्याचवेळी एक इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत असताना झालेल्या गोंधळत सभागृहातील एक महिला खाली पडली. ही गोष्ट व्यासपीठावरील अजित दादांनी पाहिली. त्यानंतर संबंधित इच्छुक उमेदवार व्यासपीठावर आला असता अजित दादांच्या प्रचंड रोष त्याला सहन करावा लागला. चिडला का माझ्यावर ? या प्रसंगानंतर अतिशय शांततेत मुलाखती झाल्या. संध्याकाळी अजित दादा निघाले असता त्यांना संबंधित कार्यकर्त्याची आठवण झाली. त्यांनी त्याला नाव घेत बोलावून घेतले. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन, तुला माझा राग आला का रे, चिडला का माझ्यावर ? अरे आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे. आपण शिस्त पाळली पाहिजे. काही प्रसंग घडला तर काय करायचे, असे म्हणून त्याची नाराजी दूर केली. मात्र, दिग्गजांच्या मांदियाळीत या कार्यकर्त्याला तिकीट देता आले नाही. परंतु, कार्यकर्त्यांसाठी दादांचा जीव तुटत होता. त्यामुळे स्वीकृतसाठी अनेकांनी सेटिंग करण्याचा प्रयत्न केला असतानाही अजित दादांनी या कार्यकर्त्याच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ घातली. या प्रसंगाला आज १४ वर्ष झाले आहेत. अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर अशा अनेक आठवणींनी शहराचा ऊर भरून आला आहे.