पिंपरी – “बडे दिनों के बाद मिली है… दे दारु दे दारु…’ या हिंदी चित्रपटाला सार्थ करत पिंपरी-चिंचवड शहरामधील मद्यप्रेमी सोमवारी (दि. 4) वाइन शॉप्सवर अक्षरश: तुटून पडले. सकाळी सात वाजल्यापासूनच मद्यपींनी “वाइन शॉप’ बाहेर साधारण एक किलोमीटरहून अधिक लांबलचक रांगा लावत दारू विकत घेण्याचा आनंद दिसत होता.
सकाळपासूनच शहराच्या बहुतेक वाइन शॉप्सच्या बाहेर तळीरामांनी मोठी गर्दी केली. दुपारचे बारा वाजले तरी काही वाइन शॉप्स उघडले नव्हते. दुकान उघडणार की नाही अशी भीती मनात घेऊन चाळीस अंश सेल्सियसच्या भयंकर उकाड्यात नागरिक रस्त्यांवर उभेच होते. अखेर दुपारनंतर दारुच्या दुकानांचे शटर उघडली आणि दारु घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली.
दारुची दुकाने उघडल्यानंतर पुन्हा मिळेल की नाही या भीतीने प्रत्येकजण जेवढे पैसे आहेत, तेवढ्याची दारु खरेदी करत होता. रांगेत पुढे उभे असणारे मोठ्या प्रमाणावर दारु खरेदी करत असल्याने रांगेत मागे उभे असणारे दारु संपते की काय? या भीतीने कासावीस होत होते. कित्येक ठिकाणी दारुसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत अक्षरश: एकमेकांच्या अंगावर पडेपर्यंत दारू खरेदी केली. दारुसाठी उतावळ्या झालेल्या या तळीरामांना काही ठिकाणी दारुआधी पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या.
सोमवारी मद्यप्रेमींनी केलेल्या गर्दीमुळे अनेक दिवस सुरु असलेल्या कडक “लॉकडाऊन’च्या तोंडालाही “फेस’आला होता. एका दुचाकीवर तीन-तीन जण बसून दारुसाठी भटकत होते. सोशल डिस्टन्सिंग नावाचा काही प्रकारच उरलेला दिसत नव्हता. या तळीरामांमध्ये काही पोलीस कर्मचारी देखील “मदिरा’सोबत घेऊन जाताना दिसून आले.