पुणे – डीएसके प्रकरणात त्यांच्या सहा वर्षीय नातवाच्या नावावर असलेला चतृ:शृंगी येथील निवासी बंगला जप्ती यादीतून वगळण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला. हा बंगला नातवाच्या नावावर असून, तो गिफ्ट डीडद्वारे त्याच्या नावावर करण्यात आला आहे. कायदेशीररित्या हा बंगला जप्तीसाठी घेता येत नाही. त्यामुळे हा बंगला वगळण्यात यावा, असे या अर्जात नमूद केले आहे. यावर विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात 9 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
ऍड. आशिष पाटणकर, ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांनी हा अर्ज केला. डीएसके यांचा चतुःशृंगी येथील 40 हजार स्क्वेअर फूटाचा “सप्तशृंगी’ हा बंगला त्यांच्या सहा वर्षीय नातवाच्या नावावर केला आहे. डिसेंबर 2016 मध्ये गिफ्ट डीडद्वारे हा बंगला त्याच्या नावावर केला आहे. अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी जप्त करता येणार नाही. त्याच्या अधिकाराचे पालन व्हावे, म्हणून हा बंगला जप्त मालमत्ता सूचीतून वगळण्यात यावा, असा अर्ज त्याचे कायदेशीर पालक शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत करण्यात आला आहे.
डीएसके यांच्या या बंगल्याची जागा 1995 मध्ये घेण्यात आली. त्यानंतर आवश्यक असलेल्या कायदेशीर परवानग्या घेऊन या जागेवर बंगला बांधण्यात आला. या बंगल्याचे बांधकाम 2006 पूर्वी झाले आहे. तर डीएसके यांच्यावर दाखल असलेला संबंधित गुन्हा 2006 नंतर घडलेला आहे. त्यांच्याविरुद्ध 2017 मध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली.
या गुन्ह्याशी संबंधीत पैशांमधून हा बंगला घेण्यात आलेला नाही. तसेच हा बंगला आता सहा वर्षीय नातवाच्या नावावर आहे. त्यामुळे कायद्यानुसार या बंगल्याचा समावेश जप्त मालमत्ता सूचीमध्ये येणार नाही. हा बंगला त्यातून वगळण्यात यावा, यासाठी डीएसके यांच्या नातवातर्फे न्यायालयात ऑब्जेक्शन अर्ज करण्यात आला असल्याची माहिती ऍड. आशिष पाटणकर, ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांनी दिली.