नगर – रोजगार हमी योजनामध्ये दिव्यांगांना काम द्यावे असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त व रोजगार हमी आयुक्त यांनी काढले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील बेरोजगार दिव्यांगांना जॉब कार्ड देण्याची प्रक्रीया सुरु झाली. मात्र, दिव्यांगांना फक्त जॉब कार्ड देण्यात आले असून, त्यांना काम मिळत नसल्याचा आरोप सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केला आहे. करोनाच्या संकटकाळात दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली असून, दिव्यांगांना रोजगार मिळणेबाबत त्वरीत स्वतंत्र आराखडा तयार करून, दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी मनरेगा यांना देण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार हीरावला गेला असून, जीवन जगणे देखील असह्य झाले आहे. शासन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जॉब कार्ड मिळाले नंतर दिव्यांग व्यक्ती संबधीत ग्रामसेवक रोजगार सेवक यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेले असता दिव्यांगांना कोणते काम द्यावे? अशा सुचना आम्हाला नसल्याने आम्ही तुम्हाला काम देवू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये शासनाच्या या धोरणा संघटनेच्या वतीन निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत उपजिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.