पुणे जिल्हा | डिंभे धरण 50 टक्के भरले ; संततधार पावसाने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

डिंभे, (वार्ताहर)- संततधार पावसाने डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, सध्या धरणात 49.90 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेले आठ दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून त्यामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
आहुपे खोर्यातून वाहणारी घोड नदी तसेच बुब्रा नदीलाही मोठा पूर झाला आहे. आहुपे, अडिवरे, आसाणे, माळीण, बोरघर, कुशिरे, मेघोली, तिरपाड आदी आदिवासी गावांच्या परिसरात सूर्यदर्शनही दुर्लभ झाले आहे. या भागातील आदिवासी बांधव घराच्या बाहेरही पडताना दिसत नाहीत.
गेल्या 24 तासांत डिंभे धरण क्षेत्रात 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज (दि. 25) सायंकाळी सहापर्यंत धरणामध्ये एकूण 506 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.धरणाची एकूण क्षमता 13.5 टीएमसी असून सध्या धरणामध्ये 6.57 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून धरणाचा सुमारे 35 किलोमीटर बॅक वॉटर पाणीसाठा गेला आहे. या परिसरात वाहणार्या वार्यामुळे धरणातील पाण्याच्या मोठ्या लाटा अनुभवायास मिळत आहेत.
संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भातखाचरे पाण्याने तुडूंब भरून वाहत आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गोहे पाझर तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी डोंगरी भागातील आहुपे खोर्यात व भीमाशंकर खोर्यात सुरू असलेल्या पावसामुळे डिंभे धरणांतर्गत असलेले बंधारे पूर्णपणे पाण्याने भरून वाहू लागले असून डिंभे धरणाचा पाण्याचा साठा झपाट्याने वाढत आहे. सध्या धरण परिसरात संततधार पाऊस सुरू असून काळ्या ढगांची चादर आकाशात पसरली असून व दाट धुक्यामुळे डोंगररांगा झाकून गेल्या आहेत.




